जिल्ह्याच्या जवानाचा पश्चिम बंगालमध्ये कर्तव्यावर असताना मृत्यू! काही महिन्यांत होणार होते सेवानिवृत्त! दोन चिमुकल्यांचे पितृछत्र हरपले!

 
खामगाव( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): बीएसएफ मध्ये कार्यरत असणाऱ्या जिल्ह्यातील सुपुत्राचा पश्चिम बंगाल मध्ये कर्तव्यावर असताना मृत्यू झाला. श्रीकांत मधुकर सातव (३७, रा. पिंपळगाव राजा, ता.खामगाव) असे मृत्यू झालेल्या जवानाचे नाव आहे. पुढील काही महिन्यांत ते सेवानिवृत्त होणार होते मात्र त्याआधीच काळाने त्यांच्यावर झडप घातली.
शेतकरी कुटुंबात जन्मलेले श्रीकांत मधुकर सातव यांनी बालपणीच सैन्यात जायचे स्वप्न बघितले होते. प्रचंड मेहनत करून वयाच्या २१ व्या वर्षी बॉर्डर सिक्युरिटी फोर्स मध्ये त्यांची निवड झाली होती. गेल्या वर्षी१७ वर्ष सेवा पूर्ण झाल्यानंतर त्यांनी १ वर्षांचा कालावधी वाढवून घेतला होता. त्यामुळे काही महिन्यांतच ते सेवानिवृत्त होऊन घरी परतणार होते. मात्र २९ मे रोजी अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांना सैन्यदलाच्या रुग्णालयात भरती करण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांचे निधन झाल्याचे बीएसएफ मुख्यालयाकडून कळविण्यात आले आहे. श्रीकांत सातव यांच्या पश्यात पत्नी, एक २ वर्षांची व दुसरी ४ वर्षांची अशा दोन चिमुकल्या मुली, वृध्द आई, लहान भाऊ व एक विवाहित बहीण असा परिवार आहे.  श्रीकांत सातव यांचे पार्थिव आज, ३१ मे रोजी सायंकाळपर्यंत मुळ गाव पिंपळगाव राजा येथे पोहचण्याची शक्यता आहे. त्यानंतर त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. श्रीकांत यांच्या मृत्यूमुळे जिल्हावासियांवर शोककळा पसरली आहे.