अपहरणाच्या घटनांत सातत्याने वाढ!; शेगावमध्ये दहावीतील मुलीचे अपहरण, मैत्रिणीकडे गेली परतलीच नाही...

 
शेगाव ( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : जिल्ह्यात अल्पवयीनांच्या वाढत्या अपहरणाच्या घटनांमुळे चिंता व्यक्त होत असताना शेगावमध्ये आणखी एका मुलीचे अपहरण झाल्याचे समोर आले आहे. गेल्या दोन महिन्यांत अपहरणाच्या ३१ घटना घडल्या असून, चालू महिन्यात सुद्धा अपहरणाच्या १४ पेक्षा अधिक घटना घडल्या आहेत. काल, २८  मार्चला शेगाव शहरातील १० वीत शिकणाऱ्या मुलीचे अपहरण करण्यात आल्याची तक्रार मुलीच्या वडिलांनी शेगाव शहर पोलीस ठाण्यात दिली.

शेगाव शहरातील गोरक्षणनगर भागात राहणाऱ्या मुलीच्या वडिलांनी (४२) दिलेल्या तक्रारीनुसार ते खासगी वाहनावर चालक म्हणून काम करतात. शेगावात कामधंदा मिळत नसल्याने कामाच्या शोधात २६ मार्चला ते मुंबईला गेले होते. दुसऱ्याच दिवशी २७ मार्च रोजी सकाळीच त्यांना त्यांची १० व्या वर्गात शिकणारी मुलगी गायब झाल्याचे मुलाने फोनवरून सांगितले.

मैत्रिणीकडे जाते, असे सांगून ती २६ मार्चच्या रात्री घराबाहेर पडली होती. रात्री उशिरापर्यंत ती घरी न आल्याने तिचा शोध सुरू करण्यात आला. मात्र ती सापडली नाही. मुलीचा शोध घेण्यासाठी तिचे वडील मुंबईवरून शेगावला परतले. त्यांनीही शोध घेतला मात्र मुलगी न सापडल्याने त्यांनी शेगाव शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. कुणीतरी अपहरण केल्याचा संशय मुलीच्या वडिलांनी तक्रारीत व्यक्त केला आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.