देशाच्या पंतप्रधानांबद्दल हाय हाय म्हणत शेगावमध्ये काँग्रेसचे आंदोलन!; कोरोना नियमांचा केला भंग!, नरेंद्र मोदींना म्हणाले कोरोनाचा खरा स्प्रेडर
Feb 11, 2022, 09:36 IST
शेगाव (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः पंतप्रधान देशाचे असतात. त्यांचा अवमान करण्याची स्पर्धाच काँग्रेसमध्ये लागल्याचे सध्या दिसून येत आहे. शेगावमध्येही ९ फेब्रुवारीला दुपारी तीनच्या सुमारास आंदोलन करताना काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी नरेंद्र मोदी हाय हाय... कोरोनाचा खरा स्प्रेडर नरेंद्र मोदी अशा अवमानजनक घोषणा दिल्या. यावेळी कोरोनाविषयक नियमांचाही भंग केला. शेगाव शहर पोलिसांनी १७ पदाधिकाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
पोलीस उपनिरिक्षक योगेशकुमार दंदे यांनी या प्रकरणात तक्रार दिली. काँग्रेसचे प्रदेश सचिव रामविजय बुरुंगले, जिल्हा उपाध्यक्ष शैलेंद्र पाटील, जिल्हा सरचिटणीस कैलास देशमुख, जिल्हा सचिव दीपक सलामपुरीया, शहराध्यक्ष किरण देशमुख, केशव हिंगणे, संतोष माने, अनिल साळवे, अनिल साळवे, पवन पचरेवाल, शेख हासम, मोहम्मद जुबेर शेख अब्दुला, बुडण खाँ जमदार, दिलीप पटोकार, सुनिता कलोरे, सविता झाडोकार, मीराताई माळी, डॉ. शबनम शेख अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज चौकात जमून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभेत महाराष्ट्र काँग्रेसबद्दल केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याबद्दल माफी मागावी. नरेंद्र मोदी हायहाय... माफी मागा माफी मागा नरेंद्र मोदी माफी मागा... कोरोनाचा खरा स्प्रेडर नरेंद्र मोदी अशा घोषणा दिल्या. यावेळी कोरोनाविषयक नियमांचा भंग केला. जमावबंदी आदेशाचे उल्लंघन केले. या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सहायक पोलीस निरिक्षक कमलेश खंडारे करत आहेत.