चालक पोलीस भरतीच्या परीक्षेला डमी उमेदवार बसवणारा बुलडाणा पोलिसांच्या ताब्यात; मध्यस्थालाही अटक; डमी उमेदवार फरारच
ऑक्टोबर २०२१ मध्ये बुलडाणा शहरातील शारदा ज्ञानपीठ शाळेच्या परीक्षा केंद्रावर चालक पोलीस भरतीची लेखी परीक्षा पार पडली होती. या परीक्षेनंतर जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात एमपीएससी समन्वय समितीचा मेल प्राप्त झाला होता. मेलमध्ये शंकर नायमाने (२४, रा. जालना) या उमेदवाराची लेखी व मैदानी चाचणी दुसऱ्यानेच दिल्याचे नमूद करण्यात आले होते.
त्यामुळे अप्पर पोलीस अधीक्षक बजरंग बनसोडे यांच्या अध्यक्षतेखाली एक चौकशी समिती नेमण्यात आली होती. चौकशी अंती शंकर नायमाने याच्याऐवजी दुसऱ्याच उमेदवाराने परीक्षा दिल्याचे निष्पन्न झाले होते. १२ फेब्रुवारी २०२२ रोजी पोलीस उपनिरीक्षक प्रिया उमाळे यांच्या तक्रारीवरून शंकर नायमाने याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर याप्रकरणाचा तपास सुरू करण्यात आला होता.
दरम्यान स्वतःच्या जागी डमी उमेदवाराला बसविणारा शंकर अट्टल भामटा असल्याचे पोलीस तपासात समोर आले. शंकरविरुद्ध पिपंरी चिंचवड मधील निगडी पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल असल्याचे समोर आले. या गुन्ह्यात तो येरवडा कारागृहात असल्याची माहिती मिळाल्यानंतर बुलडाणा पोलिसांनी त्याला येरवडा पोलीस ठाण्यातून ताब्यात घेतले आहे. सध्या त्याची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली आहे.
४ लाख रुपये देऊन होणार होता चालक पोलीस
खरा उमेदवार शंकर नायमाने याने पैठण तालुक्यातील तुपेवाडी तांडा येथील अमोल कल्याण राठोड याच्या मध्यस्थीने डमी उमेदवाराला परीक्षा देण्यासाठी आणि उत्तीर्ण होण्यासाठी ४ लाख रुपये द्यायचे ठरले होते. मात्र डमी उमेदवाराला पैसे मिळण्याआधीच या संपूर्ण प्रकरणाचे बिंग फुटले होते. त्यामुळे मध्यस्थी अमोल राठोड यालासुद्धा बुलडाणा शहर पोलिसांनी अटक केली आहे.