भरधाव दुचाकीचा अपघात; १ ठार १ गंभीर! खामगाव - अकोला रस्त्यावरील घटना

 
खामगाव ( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): भरधाव दुचाकीवरील चालकाचे नियंत्रण सुटून झालेल्या अपघातात १ जण ठार तर १ जण गंभीर जखमी झाला. खामगाव अकोला रस्त्यावरील  मोठ्या हनुमान मंदिराजवळ काल, १२ एप्रिल रोजी दुपारी २ वाजेच्या सुमारास ही घटना घडली.  गजानन श्रीपाद वानखेडे (५०, रा. लोखंडा ता. खामगाव) असे अपघातात ठार झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.
 लोखंडा पाळा येथील गजानन वानखेडे व पुंजांजी आनंद पवार (३७) हे दोघे दुचाकीने बाळापूरकडे जात होते. दरम्यान मोठ्या हनुमान मंदिराजवळ भरधाव दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने झालेल्या अपघातात गजानन वानखेडे यांचा जागीच मृत्यू झाला तर पुंजांजी पवार गंभीर जखमी झाले. अपघात घडताच स्थानिकांनी जखमीला तातडीने खामगाव येथील सामान्य रुग्णालयात दाखल केले. अपघातामुळे खामगाव - अकोला रस्त्यावरील वाहतूक तासभर विस्कळीत झाली होती. घटनास्थळी पोलीस उशीरा पोहचल्याने संतप्त नागरिकांनी अर्धा तास रास्तारोको केला.