भरधाव ट्रकने मोटारसायकलला उडवले; पती- पत्नी गंभीर, ८ महिन्यांच्या बाळाचा मृत्यू, खामगाव शहरातील घटना

 
खामगाव (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः भरधाव ट्रकने दिलेल्या जबर धडकेत मोटारसायकलवरील पती-पत्नी गंभीर जखमी झाले. त्यांच्या ८ महिन्यांच्या बाळाचा मृत्यू झाला. खामगाव - नांदुरा बायपासवरील घाटपुरी ग्रामपंचायतीजवळ आज, ६ मार्च रोजी दुपारी ४ वाजता हा अपघात झाला.

पोलीस सूत्रांच्या माहितीनुसार, जळगाव जामोद तालुक्यातील खांडवी येथील आनंद गोपाल चांडक (२८) हे पत्नी नेहा व ८ महिन्यांच्या बाळाला घेऊन घाटपुरी येथे बहिणीला भेटण्यासाठी गेले होते. बहिणीला भेटून परतत असताना घाटपुरी ग्रामपंचायतीजवळ विरुद्ध दिशेने येणाऱ्या ट्रकने (क्र. डब्लूबी २३ डी ७६६२) दुचाकीला जबर धडक दिली. यात आनंद चांडक व त्यांची पत्नी नेहा चांडक गंभीर जखमी झाले, तर त्यांचा ८ महिन्यांचा चिमुकला हर्ष याचा जागीच मृत्यू झाला.

अपघातानंतर जखमींना तातडीने सिल्व्हर सिटी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. नेहा चांडक यांना जास्त गंभीर दुखापत झाल्याने त्यांना अकोला येथे हलविण्यात आले आहे. दरम्यान अपघातानंतर शिवाजीनगर पोलिसांनी ट्रक व ट्रकचालकाला ताब्यात घेतले असून आनंद चांडक यांचे आत्येभाऊ हेमंत तुलसीदास राठी (४५, रा. बोबडे कॉलनी,खामगाव) यांच्या तक्रारीवरून ट्रकचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.