बच्चू कडूंचे निर्देश... संग्रामपूर शहर विकासाची ब्ल्यू प्रिंट तयार करा!; नगरपंचायतीत बैठक
Mar 6, 2022, 21:06 IST
संग्रामपूर (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः संग्रामपूर शहर विकासाला मोठा वाव आहे. शहराच्या शाश्वत विकासासाठी मोठे काम करावयाचे आहे. शहरात रस्ते, नाल्या, शाळा, आरोग्याची सुविधा, घरकुल तसेच पाणीपुरवठा याबाबत समीक्षा करून विकास करावा लागणार आहे. त्यासाठी संग्रामपूर शहर विकासाची ब्लू प्रिंट तयार करावी, अशी सूचना जलसंपदा, महिला व बालविकास, शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांनी आज, ६ मार्चला संग्रामपूरमध्ये केली.
संग्रामपूर नगरपंचायत सभागृहात शहर विकासासाठी विविध विषयांवर आढावा बैठक घेण्यात आली. त्यावेळी राज्यमंत्री श्री. कडू बोलत होते. यावेळी नगराध्यक्षा उषा सोनोने, उपाध्यक्ष संतोष सावतकर, उपविभागीय महसूल अधिकारी वैशाली देवकर, नगर प्रशासन विभागाचे श्री. अकोटकर, तहसीलदार श्री. वरणगावकर, मुख्याधिकारी प्रशांत शेळके, कार्यालय अधीक्षक शरद कोल्हे आदींसह नगरसेवक उपस्थित होते.
शहरात पिण्याचे पाणी आठवड्यातून १ दिवशी मिळत असल्याने २४ तासांवर कसे देता येईल याबाबत नियोजन करावे. शहरातील रस्त्यांची कामे करावी. घरकुल योजना प्रभावीपणे राबवून गरजू लाभार्थींना घरकुल योजनेचा लाभ देण्यात यावा. तसेच शहरात स्वच्छता मोहीम राबविण्यात यावी, अशा सूचनाही त्यांनी केल्या. या वेळी जिल्हास्तरीय यंत्रणांचे अधिकारी, नगर पंचायतीच्या सर्व विभागांचे अधिकारी- कर्मचारी उपस्थित होते.