वर्षभरातील "कामगिरी'ची झडती घेणार असल्याने सीओ, डेप्युटी सीओंनी बैठकीलाच मारली दांडी?; मोताळ्यातील प्रकार

 
मोताळा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः मोताळा नगरपंचायतीच्या निवडणुकीनंतर काल, २ मार्चला पहिली सभा आयोजित केली होती. सर्व १९ सदस्य उत्‍साहाने सभेला आले. पण मुख्याधिकारी, उपमुख्याधिकारी दोघेही गैरहजर असल्याने सदस्य संतप्त झाले. पहिली सभा असतानाही अधिकाऱ्यांनी अनुपस्थितीचा अपशकून केल्याने सदस्यांनी ठिय्या आंदोलन सुरू केले. ही सभा रद्द करण्यात आली. वर्षभरापासून नगरपंचायतीवर प्रशासक असून, त्‍यांच्या काळात विकासकामे तर झालीच नाहीत, पण कंत्राटदारांची देयके मात्र प्राधान्याने काढल्याची चर्चा आहे. या सभेत या विषयावर खल होण्याची शक्‍यता असल्यानेच अधिकाऱ्यांनी सभेला दांडी मारल्याची चर्चा या वेळी सुरू होती.
पहिलीच सभा असल्याने सदस्यांना अनेक महत्त्वाचे विषय मांडायचे होते. मात्र अपेक्षित उत्तर देणारे जबाबदार अधिकारीच नसल्याने सदस्यांनी गोंधळ घालायला सुरुवात केली. प्रोसेडिंगमध्ये ठराव लिहून सदस्यांनी सभा रद्द करण्याची मागणी केली. सभेला अनुपस्थित अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणीही केली. एकहाती सत्ता असलेल्या काँग्रेसला यावेळी शिवसेनेनेही साथ देत बेजबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाईला समर्थन दिले. वर्षभरापासून नगरपंचायतीवर प्रशासक असून, या कारकिर्दीत कोणती विकासकामे केली, किती निधी खर्च झाला याचा आढावा सभेत घेतला जाणार होता. मात्र अधिकाऱ्यांनीच दांडी मारल्याने आता पुढची सभा नगराध्यक्ष कधी घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.