मेंढपाळांच्या न्याय हक्कासाठी खामगावात उपविभागीय कार्यालयावर आरोळी मोर्चा!

 
खामगाव( भागवत राऊत:बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा):  देशाला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्षे पूर्ण झालेत, स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा होत असतांनाच मेंढपाळाला त्यांची मेंढरे जंगलात गेली म्हणून दीड लाखाचा दंड भरावा लागत आहे. तर काही ठिकाणी मेंढपाळ बांधवांवर जीवघेणा हल्ला होत आहे. कुठे केसेस दाखल होतात तर कुठे मेंढरे मरतात पण शासन मात्र कधीही मदतीला येत नाही. शासनाच्या या धोरणा विरोधात आज २६ सप्टेंबर रोजी सकाळी ११:३० वाजता 
खामगाव येथील उपविभागीय कार्यालयावर  मेंढपाळांच्या न्याय हक्काच्या मागण्यासाठी आरोळी मोर्चा पुकारण्यात आला होता.मोर्चा चे नेतृत्व माजी.आमदार नाना कोकरे, शरद वसतकार यांनी केले. यावेळी अशोक हटकर, सौरभ हटकर,दादाराव हटकर,प्रभाकर वरखेडे,रामाजी शिंगाडे,डॉ.संतोश हटकर,गोपाळ मारकड,रामा कोकरे यांच्यासह मोठ्या संख्येने मेंढपाळ बांधव यांची उपस्थित होती.

या आहेत मागण्या..

 मेंढपाळ आणि शेळ्या मेंढ्यासाठी स्वतंत्र एकत्रित विमा योजना सुरू करावी, इंग्रज कालीन कायद्याने बंदी घातलेली वन चटाई अधिकार उठवावे,राज्यभर पशुपालक मेंढपाळ समूहाला चटाई साठी कुरणे विकास धोरणे राबवावित, वन विभागांचा मेंढपाळ बांधवावरील अन्याय थांबवून खोट्या केसेस मागे घ्याव्या,राज्यभरात तसेच मोताळा सह खामगांव परिसरातील मेंढपाळांवर वन खात्याने केलेल्या केसेस खारीज कराव्यात , सन २०२२-२३ मध्ये नैसर्गिक आपत्तीमुळे मृत शेळ्या मेंढ्या साठी विशेष पॅकेज जाहीर करावे ,राज्यभरात शेळ्या आणि मेंढरांचे मृत्यू होत आहेत , बुलढाणा जिल्ह्यात सुद्धा मोठ्या प्रमाणात जनावरे मृत्यू पडली आहेत . या संपूर्ण नुकसान भरपाई साठी मदतीचे विशेष पॅकेज जाहीर करावे राज्यातील पशु संवर्धन विभाग व महसूल विभागा मौर्फत पंचनामा करून तातडीने मदत मिळवून द्यावी.

मेढपाळ बहुल तालुक्यात शेळ्या मेंढ्यांचे फिरते मोबाईल हॉस्पिटल ची व्यवस्था करावी, नैसर्गिक आपत्ती पासून रक्षणासाठी अत्याधुनिक तंबू वितरण करण्यात यावे ,2019 मधील खामगांव तालुक्यातील मृत पडलेल्या मेंढरांचे मदतीचे वाटप करण्यात यावे . यामध्ये तालुक्यातील भूमिहीन- अल्पभूधारक आणि पंचनामा होऊन सुद्धा उपेक्षित असलेले खरे लाभार्थी ( लाखनवाडा , हिवरखेड , शिराळा , नांद्री ) परिसरातील प्राधान्याने मदतीस पात्र असतांना त्यांची रक्कम तातडीने शासनाने सुपूर्द कारावी, पशु संवर्धन विभागातर्फे वेळोवेळी योग्य लसीकरण , विविध आजारांवर प्रबोधन शिबिरे आयोजित करावे, महामंडळ मार्फत मेंढपाळ समूहातील पशू साथी नेमावे, महामंडळावर राज्यपालांनी मेंढपाळ प्रतिनिधि नेमायला हवे, लाखनवाडा हद्दीतील मेंढपाळांना त्रास देणारा , सार्वजनिक क्षेत्रावर शेळ्या मेंढ्या चराईस शस्त्राच्या आधारावर अटकाव करणाऱ्या गुन्हेगार प्रवृत्तीच्या गाव गुंडाचा बंदोबस्त करावा, पुणे स्टेशनला शिंग्रोबा मेंढपाळ धनगराचे नाव द्यावे .