लग्नाच्या दोन महिन्यानंतर नवऱ्याला झाला भलताच साक्षात्कार..! तीन महिन्यांच्या गर्भवती बायकोला घराबाहेर हाकलले! मोताळा तालुक्यातील कोथळीची घटना

 
मोताळा( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा):  लग्नाच्या दोन महिन्यानंतर नवऱ्याला बायको दिसायला चांगली नसल्याचा साक्षात्कार झाला. आमच्याकडे  तुझ्यापेक्षा भारी पोरी भेटल्या असत्या असे म्हणत नवऱ्याने बायकोचा छळ केला. माहेरवरून २ लाख रुपये आणण्याच्या मागणीसाठी बायको गर्भवती असताना  तिला  घराबाहेर हाकलून लावले. पिडीत विवाहिता सध्या तिच्या माहेरी कोथळी येथे असून तिला तीन महिन्यांची मुलगी आहे. मात्र तिचा नवरा अजून तिला नांदवायला तयार नाही. अखेर बिचारीने काल बोराखेडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरून तिच्या नवऱ्यासह सासरच्या मंडळींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

कोथळी येथील २२ वर्षीय मुलीचे गेल्यावर्षी मे महिन्यात लग्न झाले होते. तिला सिल्लोडला देण्यात आले होते. तिच्या तक्रारीनुसार लग्नानंतर केवळ दोनच महिने तिला नवऱ्याने चांगले वागवले. मात्र त्यानंतर तुला स्वयंपाक येत नाही, तू दिसायला चांगली नाही. तुझ्यापेक्षा आमच्या सिल्लोडच्या पोरी चांगल्या आहेत असे तिचा नवरा म्हणू लागला.
   
तुझ्या बापाने लग्नात मानपान केला नाही. मनासारखा हुंडा दिला नाही आता माहेरवरून दोन लाख रुपये घेऊन ये असा तगादा तिच्याभोवती लावला. वडिलांची परिस्थिती नसल्याने ते देऊ शकत नाही असे म्हटल्यावर नवऱ्याने व सासरच्या लोकांनी बेदम मारहाण केली.

२७ जानेवारी २०२२रोजी तिला बेदम मारहाण करण्यात आली . माहेरवरून २ लाख रुपये आणत नसेल तर हिला काढून दे, फरकती घे असे तिची सासू तिच्या नवऱ्याला सांगत होती. २ लाख रुपयांची मागणी पूर्ण न करू शकल्याने ३ महिन्यांची गर्भवती असल्यापासून पीडित विवाहिता माहेरी कोथळी येथे  राहते. दरम्यान काळात नातेवाईकांनी समजूत काढण्याचा प्रयत्न करूनही तिच्या नवऱ्याच्या वागणुकीत फरक पडला नाही अखेर काल बोराखेडी पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली.