ज्ञानगंगा अभयारण्यात गुरे चारणाऱ्या शेतकऱ्यांवर होणार कारवाई! जंगलात राज्य राखीव पोलीस दलाचे जवान तैनात!

 
खामगाव ( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा):  यंदा सुरूवातीपासूनच जिल्ह्यात  पावसाने दमदार हजेरी लावली आहे. त्यामुळे बुलडाणा जिल्ह्याचे 'वैभव' असलेल्या, ज्ञानगंगा अभयारण्यात एखादा हिरवा 'शालू' पांघरावा अशी हिरवळ संपूर्ण अभयारण्यात निसर्गाने पांघरली आहे. यामध्ये गवत, वेली वेगवेगळ्या प्रकारचे लहान मोठे वृक्ष यामुळे अभयारण्याचे सौंदर्य अजूनच खुलले आहे. पण काही अवैध चराईमुळे व अभयारण्य क्षेत्रात अवैध प्रवेश करणाऱ्यांमुळे अभयारण्याचे हे नैसर्गिक सौंदर्य धोक्यात येत आहे असा दावा वनविभागाच्या वतीने केल्या जातोय.

त्यामुळे गुरे चारणाऱ्या शेतकऱ्यांना प्रतिबंध घालण्यासाठी १ जुलै २०२२ पासून 'राज्य राखीव पोलीस दल' (CRPF) ची तुकडी शस्त्रासह या ठिकाणी तैनात करण्यात आली आहे. यासह विशेष 'व्याघ्र दल' अमरावतीचे चमु, तसेच वनपरिक्षेत्र अधिकारी वन्यजीव खामगाव कार्यालय अंतर्गत एकूण ३६ कर्मचारी यांचे विशेष चराई पथक सुद्धा तैनात आहे.

ज्योती बॅनर्जी मुख्य वनसंरक्षक तथा क्षेत्र संचालक मेळघाट व्याघ्र प्रकल्प,अमरावती, अनिल निमजे विभागीय वनअधिकारी वन्यजीव विभाग अकोला व वसंत साबळे सहाय्यक वनसंरक्षक वन्यजीव अकोला यांच्या नियोजनाखाली , दिपेश लोखंडे वनपरिक्षेत्र अधिकारी वन्यजीव खामगांव, यांच्या नेतृत्वात आजपर्यंतच्या घडीला 'शिस्तबध्द' गुणवत्तापूर्वक, नियोजनामुळे ज्ञानगंगा अभयारण्य खामगांव वन्यजीव परिक्षेत्रात अवैध चराई करणाऱ्यांना चांगलाच चोप बसलेला आहे.

याच परिस्थितीत या अगोदर वनपरिक्षेत्र अधिकारी वन्यजीव कार्यालय खामगांव अंतर्गत प्रतिबंधात्मक नोटीस जारी करण्यात आलेल्या आहेत . ज्ञानगंगा अभयारण्य क्षेत्रात अवैध प्रवेश , अवैध चराई करणे हा 'वनकायद्यानुसार' गुन्हा आहे . व ह्या गुन्ह्यामध्ये कारावासाची शिक्षा तसेच दंडाची सुद्धा तरतुद केलेली आहे. त्यामुळे वनकायद्याचे उल्लंघन होणार नाही, याची सर्व वनपरिक्षेत्रात अवैद्य प्रवेश व अवैध चराई करणाऱ्यांनी दक्षता घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे.