अतिवेगाने केला घात!; दुचाकी नाल्यात जाऊन युवक ठार, खामगाव तालुक्यातील आज सकाळची घटना

 
6464
खामगाव (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः चालकाचे नियंत्रण सुटून भरधाव मोटारसायकल रस्त्याच्या बाजूला असलेल्या नाल्यात गेली. यात युवकाचा जागीच मृत्यू झाला. ही घटना खामगाव - मेहकर रस्त्यावरील आवार गावाजवळ आज, २३ एप्रिलच्या सकाळी उघडकीस आली.

खामगाव ग्रामीण पोलीस सूत्रांकडून प्राप्त माहितीनुसार, अकोला जिल्ह्याची पासिंग असलेली मोटारसायकल (क्र. एमएच ३० यू ६१८४) घेऊन अंदाजे ३० वर्षीय अनोळखी तरुण मेहकरकडे जात होता. भरधाव मोटारसायकलवरील त्‍याचे नियंत्रण सुटून रस्त्याच्या कडेला असलेल्या नाल्यात तो कोसळला. यात त्‍याचा जागीच मृत्यू झाला.

सकाळी रस्त्याने जात असलेल्या नागरिकांना अपघात झाल्याचे दिसल्याने खामगाव ग्रामीण पोलिसांना माहिती देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला. मृतदेह ओळख पटविण्यासाठी खामगाव येथील सामान्य रुग्णालयात ठेवण्यात आला आहे. वृत्त लिहीपर्यंत मृतकाची ओळख पटली नव्हती.