अल्पवयीन मावसबहिणीचे अपहरण; शेगाव शहरातील घटना
Apr 23, 2022, 20:32 IST
शेगाव (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : सख्ख्या अल्पवयीन मावसबहिणीचे अपहरण केल्याचा धक्कादायक प्रकार शेगाव शहरात समोर आला आहे. मुलीच्या वडिलांनी शेगाव शहर पोलीस ठाण्यात काल, २२ एप्रिलला दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी अपहरण करणाऱ्या मावसभावाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
शेगाव शहरातील दसरानगरात राहणाऱ्या मुलीच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीनुसार, १५ एप्रिल रोजी मुलीची आई आणि वडील कामाला गेले होते. कपड्यावर शिलाईसाठी जाते, असे लहान भावाला सांगून मुलगी निघून गेली. मात्र संध्याकाळी परतली नाही. तिचा नातेवाईक, मैत्रिणी सगळीकडे शोध घेऊनही ती सापडली नाही.
मुलीचा बाळापूर येथील मावसभाऊ एक महिन्यापूर्वी तिच्या घरी आला होता. मला तुमची मुलगी आवडते. तिच्याशी लग्न करायचे, असे त्याने त्याच्या मावशीला सांगितले होते. तेव्हा ती सध्या लहान असल्याचे मुलीच्या आईने त्याला सांगितले होते. मुलीच्या वडिलांनी साडभावाच्या घरी जाऊन पाहिले तेव्हा मुलीचा मावसभाऊसुद्धा घरी नसल्याचे कळाले. त्यामुळे मुलीच्या मावसभावानेच मुलीचे अपहरण केल्याचे तक्रारीत म्हटले आहे.