फोटो व्हायरल करण्याची धमकी देत मुलीचे अपहरण; खामगाव शहरातील घटना!
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार खामगाव शहरातील गांधी चौक भागात राहणाऱ्या ग्रामसेवक महिलेने याप्रकणाची तक्रार दिली आहे. तक्रारदार महिलेची १९ वर्षीय मुलगी गेल्या काही दिवसांपासून अस्वस्थ होती व घरात घाबरल्यासारखे वागत होती. तिला तिच्या आईने विचारणा केल्यावर खामगावच्या साईनगरात राहणाऱ्या पुरुषोत्तम सुधाकर अंबुसकर (२५) याच्याशी मैत्री झाल्याचे तिने सांगितले होते. पुरुषोत्तमने तिच्यासोबत काही फोटो काढले असून ते व्हायरल करण्याची धमकी तो देत असल्याचे तिने तिच्या आईला रडत रडत सांगितले होते.
मात्र समाजात बदनामी होईल या धाकाने तेव्हा तक्रार देण्यात आली नव्हती. दरम्यान ८ एप्रिल रोजी संध्याकाळी महिला कामावरून परतली असता मुलगी घरी दिसली नाही. मुलीचे कपडे आणि सोन्याचे दागिने सुद्धा घरात नव्हते. मुलीच्या आईने पुरुषोत्तमच्या घरी जाऊन पाहिले असता पुरुषोत्तम सुद्धा घरी नव्हता. त्यामुळे पुरुषोत्तम यानेच मुलीचे अपहरण केल्याची तक्रार मुलीच्या आईने दिली. तक्रारीवरून पोलिसांनी पुरुषोत्तम विरूध्द गुन्हा दाखल केला आहे.