जळगाव जामोद शहरात उभे राहणार एक भव्य दिव्य स्मारक! कुणाचे ते वाचा..आमदार डॉ.संजय कुटेंचा संकल्प!

 
जळगाव जामोद ( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): देशासाठी हजारो समर्पित तरुणांची फौज उभ्या करणाऱ्या अखिल भारतीय विद्यार्थी परिषदचे संस्थापक स्व. दत्ताजी डिडोळकर हे जळगाव जामोद चे भूमिपुत्र होते. दत्ताजींनी देशातील विद्यार्थी चळवळीला राष्ट्रनिर्माणाची दिशा दिली.  दत्ताजींच्या कार्याचे स्मारक म्हणून त्यांचे भव्य दिव्य स्मारक जळगाव जामोद शहरात उभारणार असल्याचा शब्द डॉ. संजय कुटेंनी दिलाय. दत्ताजींच्या जयंती निमित्त जळगाव जामोद आयोजित एका कार्यक्रमात ते बोलत होते.

यावेळी मंचावर विभाग संघचालक चित्तरंजन राठी, जिल्हा संघचालक बाळासाहेब काळे, विधानपरिषद आमदार डॉ.रामदास आंबटकर, अभाविप चे पूर्व प्रांत संघटन मंत्री सैधाजी रेड्डी यांच्यासह बुलडाणा जिल्ह्यातील अखिल भारतीय विद्यार्थी परिषदचे पूर्व कार्यकर्ते उपस्थित होते. ७ ऑगस्ट २०२२ पासून दत्ताजींचे जन्मशताब्दी वर्ष सुरू झाले.

त्यामुळे दत्ताजींच्या जन्मगावातून वृक्षारोपण करून उपक्रमांची सुरुवात झाली. दत्ताजींचा सहवास लाभलेल्या बुलडाणा जिल्ह्यातील पूर्व कार्यकर्त्यांची बैठक सुद्धा यावेळी पार पडली. यावेळी आमदार डॉ.रामदास आंबटकर, उपेंद्र कोठीकर यांचेही भाषण झाले. विभाग संघचालक चित्तरंजन राठी बोलतांना म्हणाले की, दत्ताजींच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त कार्यविस्ताराचा संकल्प करून सेवाप्रकल्प उभे करावेत.