अंबाबरवा अभयारण्यात एकाच रात्री दिसले ६ वाघ, ६ बिबटे! अस्वल, नीलगाय, रानडुक्कर, लांडग्यांचेही दर्शन...!
हे वर्णन आहे वन्य संपदेने नटलेल्या अंबाबरवा अभयारण्यात बुद्ध पौर्णिमेला रात्री पार पडलेल्या वन्य प्राणी गणनेचे ! यावेळी तब्बल ६ वाघ, ६ बिबट्यासह ८०१ वन्य जीवांचे दर्शन झाल्याने वन्य जीव विभागाचे कर्मचारी अन गणनेसाठी दूरवरून आलेले वन्य जीव प्रेमी धन्य धन्य झाल्याचे दिसून आले. संग्रामपूर तालुक्याअंतर्गत येणाऱ्या व सातपुडा पर्वताच्या कुशीत मैलोगणती पसरलेल्या अंबाबरवा अभयारण्याचे वन वैभवात मोठी आणि मोलाची भर पडल्याचे यंदाच्या गणनेने दिसून आले.
रात्रभर जागून निरीक्षण करणाऱ्या भाग्यवान निरीक्षकांना दिमाखदार ६ वाघ, ६ बिबट्यासह लहान मध्यम प्राण्यांचे दर्शन झाले! २५ पाणवठ्याजवळ उभारण्यात आलेल्या टॉवर वरून हे निरीक्षण करण्यात आले . यावेळी १५ अस्वल, शक्तिशाली असलेल्या ७० नीलगाय, ४८ गवे, आकर्षक १५१ मोर, ५४ रान कोंबड्या, ४९सांबर, १० ससे, यासह चपळ अश्या १६४ माकड, २ लँगुर त्यांच्या नजरेला पडले. याशिवाय २८ भेडकी, १७२ रानडुक्कर, ११ मसान उद, १ रान मांजर, १२ सायाळ, २ कोल्हे, ७ लांडग्यांच्याचेही दर्शन झाले.