भेंडवळच्या घटमांडणीला ३०० वर्षांचा इतिहास!; आज घटमांडणी, उद्या होणार भविष्यवाणी जाहीर! शेतकऱ्यांसह राजकारण्यांचेही लक्ष

 
जळगाव जामोद ( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): संपूर्ण राज्यभरातील शेतकऱ्यांचे लक्ष लागून असलेली जळगाव जामोद तालुक्यातील भेंडवळची घटमांडणी आज, ३ मे रोजी अक्षय तृतीयेच्या दिवशी होणार आहे. उद्या ४ मे रोजी सकाळी या घटमंडणीचे भाकीत वर्तविले जाणार आहे.

 जळगाव जामोद तालुक्यातील पुर्णा नदीच्या काठावर वसलेल्या  भेंडवळ या गावी ३०० वर्षांपासून घटमांडणीची परंपरा सुरू आहे. चंद्रभान महाराज यांनी ही परंपरा सुरू केली. चंद्रभान महाराजांचे वंशज पुंजाजी महाराज आणि त्याचे सहकारी सारंगधर महाराज हे उद्या भविष्यवाणी जाहीर करणार आहेत. या मांडणीतून वर्तविण्यात येणाऱ्या भविष्यवाणी नुसार जिल्ह्यासह राज्यातील अनेक शेतकरी पिके घेतात. पाऊस कसा असेल, यासह देशाच्या आणि राज्याच्या राजकारणाबद्दल वर्तविण्यात येणारी भाकिते खरी ठरत असल्याचे सांगण्यात येते. 
  
अशी होते घटमांडणी

अक्षय तृतीयेच्या दिवशी गावाशेजारी असलेल्या शेतात घटमांडणी करण्यात येते. घटात ज्वारी, गहू, तूर, उडीद , मूग, हरभरा, जवस, तीळ , बाजरी, तांदूळ , अंबाडी, सरकी, वटाणा, मसूर आणि करडी अशी १८ प्रकारची धान्ये ठेवण्यात येतात. मध्यभागी चार मातीची ढेकळे ठेवून त्यावर पाण्याने भरलेली घागर ठेवण्यात येते. घागरीवर पानसुपारी,पुरी, पापड, सांडया, कुरडया, भजे व वडे ठेवल्या जातात.

एकदा घटमांडणी झाली की नंतर रात्रभर तिथे कुणीही जात नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी घटामध्ये झालेल्या बदलांचे निरीक्षण करून आगामी वर्षासाठीची भविष्यवाणी करण्यात येते. पिकांचा पावसाचा अंदाज, कोणत्या महिन्यात जास्त पाऊस, कधी पाऊस कमी यावरून शेतकरी आपल्या पिकांचे नियोजन करतात. विशेष म्हणजे अक्षय तृतीयेच्या मुख्य घटमांडणी आधी गुढीपाडव्याच्या दिवशी गावातील मारुतीच्या पारावर पूर्व मांडणी केल्या जाते. या दोन्ही मांडणीत साम्य असते..दोन्ही मांडणीच्य निरीक्षणाचा अभ्यास करून ही भाकिते वर्तविली जातात. देशाचे आर्थिक आणि राजकीय भाकीत सुद्धा या मांडणीतून वर्तविण्यात येत असल्याने याकडे साऱ्यांच्या नजरा लागलेल्या असतात.