२० वर्षीय तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या; नांदुरा तालुक्यातील घटना
Mar 29, 2022, 11:11 IST
नांदुरा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : २० वर्षीय तरुणाने शेतातील निंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. काल, २८ मार्चला दुपारी नांदुरा तालुक्यातील पोटळी शिवारात ही घटना उघडकीस आली. शुभम देविदास सपकाळ (रा. पोटळी, ता. नांदुरा) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शुभम २७ मार्चच्या संध्याकाळी शेतातून जाऊन येतो, असे आजोबांना सांगून निघून गेला. मात्र रात्री उशिरापर्यंत तो घरी न आल्याने त्याचा शेतात व आजूबाजूच्या परिसरात शोध सुरू करण्यात आला. २८ मार्चच्या दुपारी गावातीलच रामभाऊ रायभान तांगडे यांच्या शेतातील निंबाच्या झाडाला शुभमचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसून आला.
घटनेची माहिती मिळताच नांदुरा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी नांदुरा येथील ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आला. शुभमच्या आजोबांनी दिलेल्या तक्रारीवरून नांदुरा पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. शुभमने आत्महत्या का केली याचे कारण अद्याप कळू शकले नाही.