शेजारी मुलाशी भांडणानंतर १७ वर्षीय मुलगा गायब!; अपहरणाची वडिलांची तक्रार

 
464
खामगाव (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः शेजारील मुलाशी भांडण झाल्यानंतर १७ वर्षीय मुलगा गायब झाल्याची घटना खामगाव शहरातील बाळापूर फैलमध्ये काल, २५ एप्रिलला रात्री साडेनऊच्या सुमारास घडली. त्‍याच्या अपहरणाची तक्रार वडिलांनी खामगाव शहर पोलीस ठाण्यात आज, २६ एप्रिलला केली आहे.

नीलेश मन्साराम पहूरकर (४३, रा. बाळापूर फैल खामगाव) यांनी या प्रकरणात तक्रार दिली. ते पत्‍नी, दोन मुले व एका मुलीसह राहतात. धान्य मार्केटमध्ये मजुरीने काम करतात. त्‍यांचा मोठा मुलगा अजयसुध्दा (१७) त्‍यांच्यासोबत धान्य मार्केटमध्ये काम करतो. काल रात्री साडेनऊला नीलेश पहूरकर धान्य मार्केटमधून घरी आले.

घराच्या बाजूला मुलांच्या भांडणाचा आवाज त्‍यांना आला. त्‍यांनी तिथे जाऊन पाहिले असता अजयला घरापासून काही अंतरावर राहत असलेला एक मुलगा शिविगाळ करत होता. त्याच्या हातात लोखंडी चायनीज कटर होते. नीलेश पहूरकर यांनी अजयला घरी आणले. त्‍यानंतर पती-पत्‍नीने मिळून त्‍याला कोणासोबत भांडण करू नको, असे समजावले.

त्‍यानंतर अजय घरातून बाहेर गेला. नंतर घरी परतलाच नाही. त्‍याच्या वडिलांनी त्याचा आजूबाजूला शोध घेतला. मात्र तो मिळून आला नाही. कुणीतरी त्‍याला पळवून नेल्याचा संशय त्‍याच्या वडिलांना आहे. रंग सावळा, सडपातळ बांधा, उंची ५ फूट ५ इंच, अंगात पिवळे टीशर्ट व काळी पँट, पायात निळी स्लीपर चप्पल असे त्‍याचे वर्णन आहे. तो कुठे मिळून आल्यास खामगाव शहर पोलिसांशी संपर्क करावा.