ATM मध्ये पैसे भरणाऱ्यांनीच ढापले 15,36,500 रुपये!; खामगाव शहरातील खळबळजनक प्रकार

 
खामगाव (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः विविध बँकांच्या एटीएम मशीनमध्ये पैसे भरण्याची जबाबदारी असलेल्या दोघांनीच साडेपंधरा लाख रुपयांचा अपहार केल्याचा धक्कादायक प्रकार खामगावमध्ये समोर आला आहे. याप्रकरणी खामगाव शहर पोलीस ठाण्यात सीएमएस कंपनीच्या शाखा व्यवस्थापकांनी तक्रार दिली. त्‍यावरून दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशाल आकनकर (२६, पूरवार गल्ली, शिवाजी आखाडा, खामगाव) आणि गणेश गिऱ्हे (३०, रा. जलंब, ता. शेगाव) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत.

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सीएमएस इन्फोसिस्टम, अकोला या कंपनीत दोघे आरोपी नोकरीला होते. कंपनीकडून विदर्भातील राष्ट्रीयीकृत व खासगी बँकांच्या एटीएम मशीनमध्ये पैसे भरण्याचे काम केले जाते. दोन्ही आरोपींकडे कंपनीने हे काम सोपविले होते. बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र, बँक ऑफ बडोदा, सेंट्रल बँक ऑफ इंडिया या विविध बँकेतून रोकड घेऊन ती खामगाव शहरात असलेल्या एटीएममध्ये भरण्याचे काम विशाल आकनकर आणि गणेश गिऱ्हे करत होते.

कंपनीच्या वतीने  १८ जानेवारी रोजी खामगाव शहरातील एटीएमचे ऑडिट केले असता १५ लाख ३६ हजार ५०० रुपयांचा अपहार झाल्याचे आढळले. कंपनीच्या शाखा व्यवस्थापकांनी आरोपींकडे चौकशी केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. अखेर शाखा व्यवस्थापक अमोल प्रकाश पांडे यांनी शहर पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनंतर चौकशीअंती काल, ३ मार्च रोजी विशाल आकनकर व गणेश गिऱ्हेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास खामगाव शहर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरिक्षक पांडुरंग इंगळे करीत आहेत.