Amazon Ad

बुलढाणा जिल्ह्यातील एक हजार महसूल कर्मचारी संपावर ! 'या' आहेत मागण्या..

 
बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) आपल्या विविध प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी बुलढाण्यासह राज्यातील महसूल कर्मचाऱ्यांनी आज सोमवार पासून  कामबंद आंदोलन सुरू केले.  यापूर्वी मागील दहा जुलै रोजी महसूल कर्मचाऱ्यांनी काळ्या फिती लावून कामकाज केले. अकरा जुलै रोजी भोजन अवकाशात जिल्हाधिकारी कार्यलयासमोर निदर्शने करण्यात आली.यापाठोपाठ बारा जुलै रोजी लेखणी बंद आंदोलन करण्यात आले. याउप्परही शासनाने मागण्यांकडे दुर्लक्ष केल्याने  महसूल कर्मचाऱ्यांनी आज पासून बेमुदत कामबंद आंदोलन सुरू केले आहे.

विविध टप्प्यात आंदोलन करणाऱ्या महसूल कर्मचाऱ्यांच्या मागण्यांकडे सरकार सोयीस्कर दुर्लक्ष करीत आहे. यामुळे सरकारवर सापत्न वागणुकीचा आरोप करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे वरील कार्यालयातील दैनंदिन कामकाज प्रभावित झाले. प्रामुख्याने हजारोच्या संख्येत आलेल्या 'लाडक्या बहिणीं'ची कामे रखडली.

हजार कर्मचारी सहभागी
दरम्यान  या आंदोलनात जिल्ह्यातील  हजार कर्मचारी सहभागी झाल्याचा दावा महसूल कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष किशोर हटकर यांनी ' बुलडाणा लाइव्ह' सोबत बोलताना केला.  यामध्ये जिल्हाधिकारी कार्यालय, सहा उपविभागीय अधिकारी (महसूल) आणि तेरा तहसिल कार्यलयातील कर्मचाऱ्यांचा समावेश असल्याचे त्यांनी सांगितले.


    या आहेत मागण्या! 

महसुलचा सुधारीत आकृतीबंध दांगट समितीच्या शिफारशीनुसार (कोणत्याही संवर्गातील कर्मचारी  कपात न करता) लागू करण्यात यावा,  अव्वल कारकुन- मंडळ अधिकारी संवर्गातून नायब तहसिलदार संवर्गात तात्काळ पदोन्नती द्यावी, पुरवठा विभागातील पदभरतीमुळे रिक्त होणाऱ्या महसुल कर्मचारी यांना महसुल विभागात सामावून घेण्यात यावे,  महसुल सहाय्यकाचा ग्रेडपे १९०० वरुन २४०० करण्यात यावा, महसुल सहायक व तलाठी यांना सेवाअंतर्गत एकसमान परिक्षा पध्दती लागू करण्यात यावी आदि

प्रमुख मागण्यासाठी हे आंदोलन करण्यात येत आहे.अव्वल कारकुन यांची वेतन निश्चिती करण्यात यावी,  महसुल सहाय्यकाची सेवा जेष्ठता यादी  महाराष्ट्र महसुल अर्हता परीक्षा नियम १९९९ नुसार तयार करावी, महसुल विभागातील अधिकारी- कर्मचारी यांची सेवापुस्तिका , महसुल विभागातील नियुक्त लेखाधिकारी यांचे वेतन पडताळणी अधिकारी मार्फत करण्यात यावी, अव्वल कारकुन  संवर्गाचे पदनाम बदलून सहायक महसुल अधिकारी असे करण्यात यावे ,नायब तहसिलदार संवर्गाचा ग्रेड वेतन ४८०० करण्यात यावा, अव्वल कारकून यांना मंडळ अधिकारी पदावर अदला बदली धोरणास नूसार पदस्थापना देण्यात यावी, नायब तहसिलदार पदासाठी अव्वल कारकून ,मंडळ अधिकारी यांचेकरीता पदोन्नती विभागीय परीक्षा सरळसेवा चे प्रमाण ७०:१०:२० असे करण्यात यावे,
वेतन देयके उणे प्राधिकारपत्रावर काढण्याबाबत तात्काळ शासन निर्णय निर्गमित करण्यात यावा, कोतवाल पदांना चतुर्थश्रेणी ड दर्जा देण्यात यावा व कोतवाल पदोन्नती कोटा वाढविण्यात यावा,या संघटनेच्या अन्य मागण्या आहे.