राजेश खन्‍नाला भेटण्यासाठी इरफानने लढवली होती ही शक्कल!

 
इरफान खान स्वतः राजेश खन्‍ना यांचे खूप मोठे चाहते होते. बॉलिवूडमध्ये येण्यापूर्वी राजेश खन्ना यांना भेटण्याची त्यांची खूप इच्छा होती. त्यासाठी एसी रिपेरिंगचे निमित्त काढून ते खन्‍ना यांच्या बंगल्यावर गेले होते. मात्र राजेश खन्ना यांना भेटायची  त्यांची इच्छा अपूर्णच राहिली होती. कारण त्या दिवशी बॉलिवूडचे पहिले सुपरस्टार राजेश खन्‍ना घरी नव्हते. इरफान खान यांनी स्वतः हा किस्सा एका कार्यक्रमात सांगितला होता...

२० एप्रिल २०२० ला बॉलिवूड अभिनेता इरफान खानचं निधन झालं आणि त्यामुळे सर्वांनाच धक्का बसला. इरफान खान यांना न्युरोएन्डोक्राईन ट्युमरचे निदान झाले होते. परदेशात उपचार घेऊनही ते जीवन मरणाची लढाई हरले आणि वयाच्या अवघ्या ५४ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास  घेतला.

इरफान खान यांचा जन्म ७  जानेवारी १९६७  मध्ये राजस्थानमध्ये झाला होता. त्यांचा परिवार गावात टायरचा व्यवसाय करायचा. जयपूरच्या गावात त्यांच्या घराण्याचं राज्य होतं. इरफान खान यांचे वडील त्या गावातील सर्वात मोठे जमीनदार होते. इरफान यांना लहानपणी क्रिकेट खूप आवडायचं. सी.के. नायडू ट्रॉफीसाठी सुद्धा त्यांची निवड झाली होती. इरफान खान यांचे काका जयपूरमधील एका थिएटरमध्ये कलाकार होते. इरफान यांनी आपल्या शहरात अनेक स्टेज परफॉर्मन्स केले. मास्टर्स डिग्री पूर्ण केल्यानंतर १९८४ मध्ये अभिनय शिकण्यासाठी दिल्लीतील नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामध्ये त्यांनी प्रवेश घेतला.

सुरुवातीला मुंबईमध्ये त्यांनी एसी रिपेरिंगचे काम केलं. १९८७  मध्ये पदवी घेतल्यानंतर त्यांनी मीरा नायर यांच्या सलाम बॉम्बे या चित्रपटातून पदार्पण केलं. मात्र या चित्रपटात त्यांची भूमिका खूपच लहान होती. चित्रपटाच्या शूटिंगमध्ये ती आणखी कमी झाली. त्यानंतर त्यांनी टीव्ही सिरीयलमध्ये सुद्धा काम केलं. त्यानंतर अनेक चित्रपटांमध्ये त्यांना काम येऊ लागलं. मात्र खरी ओळख मिळाली ती मकबूल या चित्रपटातून. त्यानंतर त्यांनी कधीच मागे वळून बघितलं नाही. हिंदी चित्रपट सृष्टीला एकापेक्षा एक उत्कृष्ट चित्रपट दिले. हॉलीवूडमध्ये इरफान खानने आपल्या अभिनयाची चुणूक दाखवली.