२०२१ मध्ये "या' हिरो-हिरोइनचे तुटले हृदय; काहींचे ब्रेकअप तर काहींचा घटस्फोट!
Dec 28, 2021, 12:39 IST
बॉलिवूड विश्वात ब्रेकअप होणे, पुन्हा नवे नाते जुळणे, घटस्फोट होणे हे काही नवीन नाही. अनेकांचे अनेकदा ब्रेकअप तर अनेकदा घटस्फोट झाल्याची उदाहरणे आहेत. २०२१ या वर्षात अनेकांचे ब्रेकअप झाले तर काहींचा घटस्फोट झाला. यात आमिर खान, नुसरत जहाँ, सामंथा, निशा रावल यांचा समावेश आहे.
- आमिर खान-किरण राव ः २०२१ या वर्षात आमिर खान आणि किरण राव यांचा घटस्फोट ही सर्वांसाठीच शॉकिंग बातमी होती. १५ वर्षांपासून दोघे पती- पत्नीच्या नात्यात होते. आमच्या संबंधात विश्वास, सन्मान आणि प्रेम होते. आम्ही आता नवीन अध्याय सुरू करत आहोत. आम्ही आता पती- पत्नी नसलो तरी माता- पिता आहोत. सिनेमा क्षेत्रात तसेच पाणी फाऊंडेशनमध्ये आम्ही एकत्र काम करणार आहोत, असे घटस्फोटानंतर आमिर आणि किरण रावने सांगितले होते. दोघांचा २००५ मध्ये विवाह झाला होता. आमिरचे किरण रावसोबत हे दुसरे लग्न होते. याआधी रिना दत्तासोबत १९८६ मध्ये त्याचे लग्न झाले होते. मात्र २००२ मध्ये त्यांचा घटस्फोट झाला होता.
- नुसरत जहाँ- निखिल जैन ः तृणमूल काँग्रेसच्या खासदार आणि बंगाली अभिनेत्री नुसरत जहाँ आणि निखिल जैन यांचाही घटस्फोट २०२१ या वर्षात झाला. २०१९ मध्ये दोघांचे टर्की येथे लग्न झाले होते. त्यानंतर भारतात त्यांनी रिसेप्शन पार्टीसुद्धा दिली होती. मात्र त्यानंतर दोघांच्या संबंधात वितुष्ट आले. दरम्यान नुसरत गरोदर राहिली आणि तिने हे बाळ यश दासगुप्ताचे असल्याचे सांगितले. तेव्हाच दोघांचा घटस्फोट पक्का असल्याचे समजले होते.
- सामंथा रूथ प्रभू- नागा चैतन्य ः दाक्षिणात्य प्रसिद्ध कलाकार सामंथा आणि नागा चैतन्य यांचे २०१७ मध्ये लग्न झाले होते. ऑक्टोबर महिन्यात सामंथाने याबाबत इन्स्टग्रामवर पोस्ट टाकून दोघे वेगळे होत असल्याची घोषणा केली होती. आमची मैत्री आमच्या नात्यांचा आधार होती, असे तिने पोस्टमध्ये म्हटले होते.
- निशा रावल-करण मेहरा ः ये रिश्ता क्या कहलाता हैं... या मालिकेतील प्रसिद्ध अभिनेता करण मेहरा याचे खरेखुरे वैवाहिक जिवन या वर्षात चर्चेत राहिले. त्याची पत्नी निशा रावलने करण मोहरा याच्यावर कौटुंबिक हिंसाचाराचा आरोप केला. तिने पोलिसांत तक्रार दिली. सध्या प्रकरण न्यायप्रविष्ट असून दोघेही वेगळेवेगळे राहत आहेत.