ऋतिक रोशन मारुती कारने यायचा अन् मी... अमिषा पटेलचा खुलासा

 
कहो ना प्यार है या चित्रपटातून अमिषा पटेलने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. तिचा पहिलाच चित्रपट सुपरहिट ठरला. त्यानंतर सनी देओल सोबतच्या गदरने तर तिला आणखी  मोठी ओळख दिली. गेल्या काही काळापासून ती सिनेसृष्टीपासून दूर असली तरी सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असते. सोशल मीडियाच्या माध्यमातून ती चाहत्यांच्या संपर्कात राहते. अमिषाने नुकत्याच एका मुलाखतीत काही बाबींवर भाष्य केले आहे. लोक मला माझ्या माघारी गर्विष्ठ आणि अहंकारी समजत होते, असे अमिषा म्हणाली.
दक्षिण मुंबईतील एक श्रीमंत आणि बिघडलेली मुलगी असे मला सादर करण्यात आले. मी कुणाची चुगली केली नाही. सेटवर कुणाला शिव्या दिल्या नाहीत. सेटवर मी कोणताच मूर्खपणा केला नाही आणि या गोष्टींकडे मी लक्षही दिले नाही. मी पुस्तके वाचायची. एखादे पुस्तक मी तीन दिवसांत वाचून टाकत होते. त्यामुळे अमिषा खूप गर्विष्ठ आहे असे अनेकजण म्हणायचे. ती स्वतःला काय समजते, असे अनेक जण माघारी बोलायचे, असेही अमिषा म्हणाली. एका मोठ्या परिवारातील असल्याने शूटिंगच्या पहिल्या दिवशी मी मर्सिडीज कारमधून आले तर ऋतिक रोशन त्याच्या मारुती कारमधून सेटवर आला. यावरही लोकांनी टिंगल केली. मात्र यात दिखावा करण्यासारखे काहीच नव्हते, असे अमिषा म्हणाली. दरम्यान लवकरच अमिषा ही सनी देओल आणि उत्कर्ष शर्मासोबत गदर चित्रपटाच्या सिक्वेलमध्ये दिसणार आहे.