Chanderi News : २०२१ मध्ये "या' अभिनेत्रींना चढावी लागली कोर्टाची पायरी...

 
मुंबई : २०२० आणि २०२१ ही दोन्ही वर्षे कोरोनामुळे लोकांच्या स्मरणात राहील. बॉलिवूडच्या काही अभिनेत्रींना २०२१ हे वर्ष तर खूपच अडचणीचे गेले. कायदेशीर बाबींमुळे त्यांना मनस्ताप सहन करावा लागला. यात ऐश्वर्या राय, जॅकलीन फर्नांडिस, कंगना राणावत या दिग्गज अभिनेत्रींचा समावेश आहे.
  • ऐश्वर्या राय बच्चन ः गेल्या काही दिवसांपूर्वी बॉलीवूड स्टार आणि बच्चन परिवाराची सून असलेल्‍या ऐश्वर्या रायला इडीने चौकशीसाठी बोलावले होते. पनामा पेपर्स लिक प्रकरणांमध्ये ऐश्वर्या रायची चौकशी केली. यावेळी ऐश्वर्याला अनेक प्रश्न विचारले गेले. अमीक प्रमोटर्स नावाच्या कंपनीची ऐश्वर्या संचालक होती. २००५ मध्ये सुरू झालेली ही कंपनी २००८ मध्ये बंद झाली होती.
  • जॅकलीन फर्नांडिस ः २०० कोटी रुपयांच्या कथित फसवणुकीच्या प्रकरणात इडीने भामटा सुकेश चंद्रशेखरला ताब्यात घेतले. या सुकेशसोबत मनी लाँड्रींग आणि जबरदस्ती वसुली प्रकरणात जॅकलीन फर्नांडिसच्या विरोधात लूक आउट नोटीस जारी केली होती. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार साक्षीदार म्हणून जॅकलीनसुद्धा या प्रकरणात समाविष्ट आहे. सुकेश ने फसवणुकीच्या पैशातून जॅकलीनला महागड्या भेटवस्तू दिल्या होत्या. त्यामुळे इडीने जॅकलीनची चौकशी केली. तिला देशाबाहेर न जाण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
  • कंगना राणावत ः कंगना तिच्या वादग्रस्त वक्‍तव्यांनी या वर्षात नेहमीच चर्चेत राहिली. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, खासदार संजय राऊत यांच्याशी तिने चांगलाच पंगा घेतला. तीन कृषी कायदे रद्द करण्यासाठी आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना तिने दहशतवादी म्हटले होते. याशिवाय भारताला १९४७ ला नव्हे तर २०१४ ला स्वातंत्र्य मिळाले, असे वादग्रस्त विधान तिने केल्याने तिला ट्रोल करण्यात आले होते.
  • तापसी पन्नू ः अभिनेत्री तापसीसाठीही हे वर्ष काही चांगले राहिले नाही. आयकर विभागाने तापसीच्या घरी छापेमारी केली हाती. अनुराग कश्यप आणि ती ६५० कोटी रुपयांच्या करचुकवेगिरीच्या प्रकरणात समाविष्ट असल्याचा आरोप आहे. त्यामुळे ते आयकर विभागाच्या रडारवर आहेत.
  • नोरा फतेही ः २०० कोटी रुपयांच्या फसवणूक प्रकरणातील आरोपी सुकेश चंद्रशेखर याने नोरा फतेही हिलासुद्धा महागड्या भेटवस्तू दिल्या होत्या. नोराला त्याने फसवणुकीच्या पैशातून महागडी रेंज रोव्हर कार गिफ्ट दिली होती. दोघांचे चॅट सध्या व्हायरल झाले आहेत. याप्रकरणात इडीने नोराला चौकशीसाठी बोलावले होते. देश सोडून न जाण्याच्या सूचना नोराला देण्यात आल्या आहेत.