बुलडाणेकरांच्या भेटीला येतोय "फास'! रविकांत तुपकरांनी मांडली कथा अन् व्यथा!!
Jan 29, 2022, 16:09 IST
बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः शेतकरी आत्महत्यांची कारणमीमांसा करतानाच त्यासाठी जबाबदार घटक शोधून कास्तकाराला आत्मघातापासून परावृत्त करण्याचा प्रामाणिक प्रयत्न फास या चित्रपटातून करण्यात आला आहे. कठोर वास्तवावर आधारित या चित्रपटाची चमू आज आत्महत्याग्रस्त बुलडाणा जिल्ह्यात अवतरली अन् त्यांनी प्रसिद्धी माध्यमासमोर चित्रपटाची कथा अन् शेतकऱ्यांची व्यथा मांडली.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेत्यांनी ही टीम व माध्यमांच्या भेटीचा योग जुळवून आणला. पत्रकार भवनात आज, 29 जानेवारीला दुपारी पार पडलेल्या या गेट टूगेदरमध्ये निर्मात्या माहेश्वरी पाटील चाकूरकर, निर्देशक अविनाश कोलते, बळीराम या मुख्य नायकाची भूमिका साकारणारे अभिनेते अविनाश कोलते, नृत्यांगना ज्योतिका लोंढे, पूजा तायडे यांचेसह रविकांत तुपकर यांनी चित्रपटावर प्रकाशझोत टाकला. सशक्त कथानक, चतुरस्त्र अभिनयाने नटलेला फास हा येत्या 4 फेब्रुवारीला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे.