सलमानसोबत काम करण्यास अर्पिताच्या नवऱ्याचा नकार!; म्हणाला...

 
बॉलिवूडचा सुपरस्टार सलमान खान चा "कभी ईद कभी दिवाली' हा आगामी चित्रपट सध्या चांगलाच चर्चेत आहे. यंदा ईद किंवा दिवाळीत हा चित्रपट प्रदर्शित होऊ शकतो. या चित्रपटात एका भूमिकेसाठी सलमानची बहीण अर्पिताचा नवरा आयुष शर्माला विचारण्यात आले होते. मात्र आयुष शर्माने या चित्रपटात भूमिका साकारण्यासाठी नकार दिला आहे.

याआधी सलमान आणि आयुषने "अंतिम' या चित्रपटात एकत्र काम केले आहे. या चित्रपटाच्या यशानंतर सुद्धा आयुषने नकार का बरं दिला असेल, या प्रश्नामुळे बॉलिवूड इंडस्ट्रीत चर्चा रंगली आहे. कभी दिवाली कभी ईद या चित्रपटात आयुष शर्माला सलमानच्या लहान्या भावाच्या भूमिकेसाठी विचारण्यात आले होते. बॉलिवूड हंगामाने दिलेल्या वृत्तानुसार आयुष शर्मा या चित्रपटाचा भाग नसेल.

करिअरच्या मुख्य टप्प्यावर साईड रोलपेक्षा मुख्य भूमिका साकारली पाहिजे असे वाटत असल्यानेच त्याने सलमानचा मोठा चित्रपट करण्यास नकार दिला. अंतिम-द फायनल टुथ या चित्रपटाच्या यशाने आयुष सध्या जाम खुश आहे. प्रेक्षकांना त्याचा अभिनय आवडल्याने आता त्याच्यात आत्मविश्वास निर्माण झाला आहे. तो एकटा चित्रपट यशस्वी करू शकतो. त्यामुळे फक्त प्रमुख भूमिका असलेला चित्रपटच करायचा असा निर्णय आता आयुषने घेतला आहे.