अली अकबर हिंदू धर्म स्वीकारणार!, सांगितले हे धक्कादायक कारण!!

 
मल्याळम चित्रपट निर्माते अली अकबर यांनी आश्चर्याचा धक्का दिला असून, मुस्लिम धर्म सोडून पुन्हा हिंदू धर्मात परतण्याचा निर्णय त्‍यांनी जाहीर केला आहे. संरक्षण दलप्रमुख बिपिन रावत यांच्या अपघाती मृत्‍यूनंतर मुस्लिम कट्टरपंथीयांनी सोशल मीडियावर केलेल्या जल्लोषामुळे ते निराश झाले असून, लाइव्ह व्हिडिओ तयार करून अशा प्रकारच्या जल्लोषावर कडक शब्‍दांत टीका करताना त्‍यांनी घरवापसीचा मनोदय व्यक्‍त केला.

लाइव्ह व्हिडिओमध्ये अली अकबर म्‍हणाले, की मला आश्चर्य वाटले की देशाच्या एका वीर व्यक्‍तीच्या मृत्‍यूवर कुणी आनंदीत कसे होऊ शकते... ही गोष्ट माझ्या आकलनापलिकडे आहे. ती मी कधीच स्वीकारू शकत नाही. त्‍यामुळे इस्लाम धर्म सोडण्याचा निर्णय मी घेतला आहे. मी माझ्या कुटुंबासह मुस्लिम धर्म सोडून हिंदू धर्मात परत येऊ, असे ते म्‍हणाले.

त्‍यांची पत्नी लुसिम्मासुद्धा हिंदू धर्म स्वीकारेल. हिंदू धर्मात त्‍यांचे कोणते नाव असेल हेही अली अकबर यांनी जाहीर केले असून, रामसिम्हन असे त्‍यांचे नाव असेल. रामसिम्हनने संस्कृती रक्षणार्थ बलिदान दिले होते. त्‍यामुळेच त्‍याचे नाव धारण करणार असल्याचे अली अकबर म्‍हणाले. इस्लामच्या सर्वांत मोठ्या धर्मगुरू आणि नेत्यांनीसुद्धा कट्टरपंथीच्या वागण्यावर आक्षेप घेतला नाही.

त्‍यामुळे त्‍यांनीसुद्धा एका वीर अधिकाऱ्याचा अपमान केला आहे. आता माझा इस्लाम धर्मावर विश्वास राहिलेला नसल्याने मी तो धर्मच सोडण्याचा निर्णय घेतला आहे, असेही अली अकबर यांनी लाइव्ह व्हिडिओत म्‍हटले आहे. वीर अधिकाऱ्याच्या मृत्‍यूवर जल्लाेष करणाऱ्यांना हेच माझे उत्तर आहे, हेही सांगण्यास ते विसरले नाहीत.