तुषार कपूर म्हणतो, मला नाही वाटत माझं लग्न होईल..!
Feb 19, 2022, 16:32 IST
मुझे कुछ कहना है, गायब, खाकी, क्या कूल है हम, गोलमाल, द डर्टी पिक्चर यांसारख्या चित्रपटांत अभिनयाची चुणूक दाखवणारा अभिनेता तुषार कपूर लग्न न करताच एका मुलाचा बाप झाला. या निर्णयाबद्दल सविस्तर सांगण्यासाठी त्याने बॅचलर डॅड नावाचं एक पुस्तकही लिहिलं आहे. नुकत्याच एका मुलाखतीत त्याने स्वतःच्या लग्नाबद्दल भाष्य केले असून, लग्न केले तरच आयुष्यात सेटल होता येत हा काही यशाचा मंत्र नाही, असे त्याने म्हटले आहे. चित्रपट निर्माता प्रकाश झा यांनी मला सरोगसी पिता बनण्याचा मार्ग सूचवला.आता कधी लग्न करेल असे वाटत नाही. अर्थात ही भविष्यातील गोष्ट असल्याने नक्की याबद्दल सांगता येणार नाही, असं तो म्हणाला.
काेरोनाकाळात मुलाची काळजी घेणे खूप आव्हानात्मक होते.ऑनलाइन शाळा असल्याने त्यात माझ्या मुलाला ॲडजस्ट व्हायला वेळ लागला. मात्र त्यानंतर मजा यायला लागली. माझा अर्धा दिवस त्यात जात होता. कोरोना काळात त्याच्यासोबत घरीच रहावे लागत होते. याबद्दल मी सविस्तर पुस्तकात लिहिले आहे, असे त्याने सांगितले. सरोगसी पिता होण्याचा निर्णय घेणे सोपे नव्हते.
लोक काय म्हणतील असेही अनेकदा वाटत होते. मात्र त्याचा विचार करायचा नाही, असे मी ठरवले. प्रकाश झा यांनी माझी भेट तिरुपती येथील एका परिवाराशी करून दिली. ती एक सिंगल मदर होती. सरोगसीच्या माध्यमातून ती आई झाली होती. बायोलॉजिकल पिता व्हायचे असेल तर सरोगसी हा एक उत्तम मार्ग आहे, असे प्रकाश झा यांनी सांगितले आणि मी तो निर्णय घेतला, असे तुषार कपूर सांगतो.