भाषा संबुली म्‍हणतात, प्रत्यक्ष जीवनात अनुभवले तेच काश्मीर फाइल्समध्ये!; म्‍हणाल्या, कॅमेरा बंद असतानाही चिन्मयची भीती वाटायची!!

 
देशभरात सध्या द काश्मीर फाईल्स चित्रपटाची जोरदार चर्चा आहे. बॉक्स ऑफिसवर चित्रपटाने चांगलाच धुमाकूळ घातला आहे. केवळ १४ कोटींचे बजेट असलेल्या हा चित्रपट कमाईचे सर्वच रेकॉर्ड तोडत आहे. दरम्यान चित्रपटात शारदा पंडित यांची भूमिका साकारणाऱ्या कलाकार भाषा संबुली यांनी नुकतीच एका वृत्तवाहिनीला मुलाखत दिली. प्रत्यक्ष जीवनात जे अनुभवले तेच काश्मीर फाईल्समध्ये मांडण्यात आल्याचे ती म्हणाली. मी आईच्या गर्भात असताना माझ्या आईला काश्मीर सोडावे लागले होते, असे ती म्हणाली.

भाषाचे बालपण दिल्लीतील निर्वासितांच्या शिबिरात गेल्याचे तिने सांगितले. निर्वासितांच्या शिबिरात आमच्या वाट्याला मोठा संघर्ष आला. त्या काळात माझ्या आई- वडिलांना खूप हाल अपेष्टा सहन कराव्या लागल्या. आम्ही कोण आहोत असा प्रश्न नेहमीच पडायचा, असे भाषा म्हणाल्या. चित्रपटात सर्वाधिक कठीण सीन कोणता, असा प्रश्न भाषा यांना विचारला असता त्या म्हणाल्या की, शारदाच्या पतीची हत्या केल्यानंतर पतीच्या रक्ताने माखलेले तांदूळ दहशतवादी तिला खायला घालतात.

हा केवळ एक सीन नसून सत्य घटना आहे. या सर्व गोष्टी ऐकून मी लहानाची मोठी झाली आहे, असे भाषा म्हणाल्या. चित्रपटातील प्रत्येक सीन आव्हानात्मक होता. चित्रपटात चिन्मय मांडलेकरने बिट्टा कराटेची भूमिका साकारली आहे. माझी शारदाच्या भूमिकेसाठी जी प्रशंसा  केली जात आहे त्याचे सर्वाधिक श्रेय चिन्मय मांडलेकर आणि विवेक अग्निहोत्री यांचे आहे. कॅमेरा बंद असताना सुद्धा चिन्मय म्हणजेच बिट्टा कराटेची भीती वाटत होती, असे भाषा यांनी सांगितले.