अजय देवगणसोबत पुन्हा दिसणार तब्बू..."भोला'ची शूटिंग सुरू

 
अभिनेता अजय देवगण आणि अभिनेत्री तब्बू यांनी आतापर्यंत अनेक चित्रपटांत एकत्र काम केले आहे. दोघांनी बॉलिवूडला अनेक सुपरहिट चित्रपट दिले आहेत. आता पुन्हा एकदा त्यांची जोडी मोठ्या पडद्यावर दिसणार आहे. स्वतः तब्बू ने तिच्या इन्स्टाग्राम खात्यावरून ही माहिती दिली आहे. आगामी चित्रपट भोलाची शूटिंग सुरू झाल्याचे तिने तिच्या पोस्टमध्ये म्हटले आहे. भोला हा चित्रपट सुपरहिट तामिळ चित्रपट "कैथी'चा हिंदी रीमेक आहे.

अजय देवगण या चित्रपटात केवळ ॲक्टिंगच नाही तर निर्माता म्हणूनही काम करत आहे. कैथीच्या हिंदी रीमेक वर काम करीत असल्याचे त्याने २०२० मध्येच सांगितले होते. धर्मेंद्र शर्मा या चित्रपटाचे दिग्दर्शक म्हणून काम पाहत आहेत.

तब्बू आणि अजय देवगणने याआधी विजयपथ, हकीकत, गोलमाल अगेन, दृश्यम, दे दे प्यार दे यांसारखे सुपरहिट चित्रपट दिले आहेत. अजयने सध्या दृश्यम २ चित्रपटाचे शूटिंग सुरू केले आहे. या आधी अजय देवगन रोहित शेट्टीच्या सूर्यवंशीमध्ये दिसला होता. पुढील काही दिवसांत तो थँक गॉड, मैदान, रनवे ३४ या चित्रपटांत दिसणार आहे. लवकरच  तो सिंघम ३ आणि रेड ३ या चित्रपटांची शूटिंग सुरू करणार आहे.