देशातील सर्वांत मोठ्या डायरेक्टर राजमौलींची सक्सेस स्टोरी जाणून घ्या!;
राजामौली यांचा जन्म १० ऑक्टोबर १९७३ रोजी दक्षिण भारतीय पटकथा लेखक के.व्ही. विजयेंद्र प्रसाद आणि राजा नंदिनी यांच्या घरी झाला. त्यांचे पूर्ण नाव कोडुरी श्रीशैला राजामौली आहे. राजमौली यांनी त्यांच्या करिअरची सुरुवात ईटीव्ही तेलुगू या वाहिनीवरील एका शोमधून केली होती.
त्यानंतर ते के. रघुवेंद्र राव यांच्यासोबत सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम करायचे. काही काळ टेलिव्हिजनमध्ये काम केल्यानंतर त्यांना कामाचा अनुभव आल्यानंतर २००१ मध्ये ते मोठ्या पडद्याकडे वळले. त्यांनी ज्युनियर एनटीआरसोबत स्टुडंट नंबर १ हा चित्रपट बनवला आणि दिग्दर्शक म्हणून मोठ्या पडद्यावर पदार्पण केले. त्यांचा पहिलाच चित्रपट हिट ठरला. त्यानंतर त्याचा दुसरा चित्रपट सिम्हाद्री प्रदर्शित होण्यासाठी दोन वर्षांचा कालावधी लागला. त्यानंतर २००४ मध्ये नितीन आणि जेनेलिया डिसूझा यांना घेऊन त्यांनी सई चित्रपट बनवला. त्यालाही चांगले यश मिळाले.
यानंतर २००५ मध्ये राजामौली यांनी प्रभाससोबत छत्रपती चित्रपट बनवला. या चित्रपटाने त्यांना मोठी प्रसिद्धी मिळवून दिली. २००५ मध्ये त्यांनी रवी तेजासोबत विक्रमकुडूमध्ये काम केले. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर बक्कळ कमाई केली. यानंतर त्यांनी विक्रमकुडूचा तामिळमध्ये सिरुथाई, हिंदीमध्ये राउडी राठौर आणि कन्नडमध्ये वीरा मडकरी नावाने रिमेक बनवले. हे सर्व सिनेमे सुपरहिट ठरले. राजामौली यांच्या चित्रपटांची खास गोष्ट म्हणजे ते स्वत: त्यांच्या चित्रपटांमध्ये अभिनय करतात. काही ना काही व्यक्तिरेखा साकारतात. २००९ मध्ये मगधीरा आणि २०१२ मध्ये ईगा या चित्रपटांतून त्यांनी स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. एस.एस. राजामौली यांना २०१६ मध्ये पद्मश्री पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले आहे.
राजामौली यांनी त्यांच्या चित्रपटांद्वारे चित्रपट निर्मितीचा स्तर वाढवला आणि प्रत्येकाच्या अपेक्षा पूर्ण केल्या. बाहुबली फ्रँचायझीच्या बाहुबली: द बिगिनिंग आणि बाहुबली: द कन्क्लूजन या चित्रपटांनी राजामौली यांना आंतरराष्ट्रीय स्तरावर ओळख मिळवून दिली, तेव्हापासून राजामौली यांची भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वात मोठ्या दिग्दर्शकांमध्ये गणना होते. आता राजामौली यांचा आणखी एक मोठा चित्रपट RRR आज, २५ मार्चला थिएटरमध्ये रिलीज झाला आहे. या चित्रपटात राम चरण, ज्युनियर एनटीआर, आलिया भट्ट आणि अजय देवगण मुख्य भूमिकेत आहेत.