52 वर्षांनंतर प्रतापराव जाधवांनी केली हॅट्ट्रिकची नोंद!
विधानसभा निवडणुकीच्या विजयाची हॅट्ट्रिक करण्याची किमया करणारे प्रतापराव जाधव यांनी लोकसभा निवडणुकीत देखील हा विक्रम केला. असा विक्रम करणारे ते जिल्ह्यातील पहिले नेते ठरले. लोकसभेत हा रेकॉर्ड काँग्रेसचे शिवराम राणे यांनी केला होता. त्यांनी 1957, 1962 व 1967 मध्ये सलग विजय मिळविले होते. मात्र तेव्हा बुलडाणा जिल्हा जळगाव मतदारसंघात समाविष्ट होता. स्वतंत्र बुलडाणा मतदारसंघ 1977 मध्ये अस्तित्वात आला. तेव्हापासून 2004 पर्यंत एकाही नेत्याला सलग 3 विजय मिळविला आला नव्हता... आज, 25 नोव्हेंबरला खासदार प्रतापराव जाधव यांचा वाढदिवस. त्या निमित्ताने...
पहिल्याच लढतीत विजयी
सन 2009 ची निवडणूक मजेदार ठरली. मेहकर विधानसभा मतदारसंघ राखीव झाल्याने प्रतापराव जाधव यांना नाईलाजाने दिल्लीचा रस्ता धरावा लागला. त्यांना सामाजिक अडचणीमुळे तर राजेंद्र शिंगणे यांना राजकीय कारणामुळे मैदानात उतरावे लागले. या 2 दिग्गजांतील लढतीत जाधव यांनी 28 हजारांच्या निसटत्या फरकाने बाजी मारत देशाची राजधानी गाठली! लोकसभेतील त्यांच्या भावी यशाची व हॅट्ट्रिकची ती पायाभरणी ठरली. बहेनजींच्या हत्तीने 81 हजार मते घेत काँग्रेस आघाडीचे मनसुबे पायदळी तुडविले.
सर्वच रेकॉर्ड मोडीत...
सन 2014 ची एकतर्फी निवडणूक म्हणजे सर्वच रेकॉर्ड मोडीत काढणारी ना भूतो न भविष्यती अशी निवडणूक ठरली. नरेंद्र मोदी नामक त्सुनामी लाटेत विरोधक पार वाहून गेले. दिग्गज पराभूत झाले. तिथे बुलडाणामध्ये काय वेगळे होणार होते? त्यामुळे ऐनवेळी उमेदवारी मिळालेले माजी आमदार कृष्णराव इंगळे यांचा पराभव होण्यात त्यांची काहीच चूक नव्हती. त्यांचा मतांचा स्कोअर साडे तीन लाखांच्या घरात (3 लाख 49 हजार) पोहोचला, पण प्रतापराव जाधव यांचा स्कोअर 5 लाख 11 हजारांवर पोहोचला. त्यांचा लिडच 1 लाख 62 हजारांवर गेला. झालेल्या 9 लक्ष 78 हजार 392 मतांपैकी 8 लाख 61 हजार 518 मते या दोघांनीच वाटून घेतल्यामुळे ती लढत एकतर्फी ठरली हे सांगायचे कामच राहिलं नाय! सलग दुसऱ्या विजयाने प्रतापराव जाधव भावी हॅट्ट्रिकच्या उंबरठ्यावर पोहोचले.
...आणि हॅट्ट्रिक
निकालापूर्वी रणसंग्राम व निकालांती एकतर्फी ठरलेल्या गत् 2019 च्या लढतीत प्रतापराव जाधव यांनी नुसताच विजय मिळवला नाही तर रेकॉर्ड ब्रेक हॅट्ट्रिक साधली. त्यांनी 5 लाख मतांचा आकडा पार करत 5 लाख 21 हजार 977 मते घेतली. तसेच पारंपरिक प्रतिस्पर्धी राजेंद्र शिंगणे (3 लाख 88 हजार 690 मते) यांचा 1 लाख 72 हजार 627 मतांच्या फरकाने दणदणीत पराभव करत चारीमुंड्या चित केले. बुलडाणा लोकसभा मतदारसंघाच्या सन 1952 पासूनच्या लढतीचा आढावा घेतला तर काँग्रेसचे शिवराम राणे यांच्यानंतर हॅट्ट्रिक साधणारे ते दुसरे खासदार ठरले. स्वतः घाटावरील रहिवासी असताना त्यांना घाटाखालील जळगाव जामोद (36984), खामगाव (33279) या विधानसभा मतदारसंघातून जबरदस्त लीड मिळाला. सर्वच म्हणजे 6 मतदारसंघातही त्यांना मताधिक्क्य मिळाले. राजेंद्र शिंगणे यांच्या सिंदखेड राजामध्ये त्यांना 5992, मेहकरात 6335, चिखलीत 23861 तर बुलडाण्यात 25793 मतांचा लीड मिळाला.