नव्या वर्षाच्या स्वागतासाठी बुलडाणेकर सज्ज! "ज्ञानगंगा" जंगल सफारीसाठी १९ जिप्सी बुक! कसे करायचे बुकिंग अन् किती येतो खर्च? बातमीत वाचा....
शहरालगतच्या ऐतिहासिक व धार्मिक वास्तूस्थळी सहली, जिल्ह्यातील पर्यटन स्थळांना भेटीचे बेत आखल्या जात असून, निसर्ग सौंदर्याने नटलेले ज्ञानगंगा अभयारण्य जिल्ह्यातीलच नव्हे तर देश-विदेशातील पर्यटकांना खुणावत आहे. वर्षारंभ म्हटला की, दरवर्षी डिसेंबर महिन्यात न चुकता सहलीला जाण्याचा बेत ठरतो. सरत्या वर्षाला निरोपासह नववर्षाचे स्वागत करण्यासाठी बुलडाणेकरांनी नियोजन सुरू केले आहे.अनेकांनी हॉटेलमध्ये थर्टी फर्स्ट करण्याचे ठरविले तर पर्यावरण प्रेमींनी निसर्गाच्या सानिध्यात नववर्षाचे स्वागत करण्याचा बेत आखला आहे. जैवविविधतेने नटलेले ज्ञानगंगा अभयारण्य अनेकांना भुरळ घालत असल्याने बुकिंग करण्यासाठी पर्यटकांमध्ये चढाओढ असते. आगामी ३-४ दिवसातच ज्ञानगंगाची बुकिंग फुल होणार आहे. गेल्या दीड वर्षात वन्यजीव विभागाला जंगल सफारीच्या माध्यमातून १३ लाखांचा महसूल प्राप्त झाला होता. कोरोना काळानंतर १७ महिन्यात ९ हजार १२२ पर्यटकांनी भेट देऊन निसर्ग अनुभूतीचा आनंद लुटला. हिवाळ्यात पर्यटक जंगल सफारीचा मनसोक्त आनंद घेतात. आता तर नववर्षाचा योग जुळून आला आहे. त्यामुळे जंगल सफारीला उस्फूर्त प्रतिसाद मिळेल असे वन्यजीव विभागाच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.२२ हजार हेक्टर क्षेत्रात विखुरलेल्या या अभयारण्यात बीबट, अस्वल, चितळ, सांभार, हरीण,निलगाय, सायाळ, मोर आदीं वन्यजीव आढळून येतात.
कुठे करणार बुकिंग?
जंगल सफारी साठी दोन ठिकाणी बुकिंग केली जाते. बोथापरिक्षेत्रातील खामगाव चिंच फाटा व बुलडाणा वनपरिक्षेत्रासाठी गोंदनखेड फाट्याच्या गेटवर ऑफलाइन बुकिंग करू शकतो.तेथून जिप्सी मध्ये पर्यटकांना जंगल सफारीसाठी सोडण्यात येते. ऑनलाइन पद्धतीने सुद्धा मॅजिकल मेळघाट या वेबसाईटवर बुकिंग केली जाते.
जंगल सफारीत काय पाहणार?
बुलडाणा वनपरिक्षेत्रातील दानमाळ, सागरमाळ, लाखाचा झिरा, आणि अभयारण्याला ज्ञानगंगा जे नाव मिळाले त्या ज्ञानगंगा नदीचे उगमस्थान त्याचबरोबर पलढग डॅम मध्ये मानसोक्त नौकाविहार आणि निसर्गाचा आनंद लुटता येईल.
एका जिप्सीत ६ पर्यटक
एका जिप्सी ६ पर्यटक बसण्याची व्यवस्था केली जाते. २४५० रुपयांचे बुकिंग करावे लागते. त्यामध्ये शासनाचे ४०० रुपये शुल्क, गाईड यांचे साडेतीनशे रुपये, तर वाहनांचे भाडे म्हणून १७०० रुपये असे एकूण २४५० रुपये पर्यटकांना खर्च येतो.