पाऊस थांबणार नाही? हवामान विभागाने वर्तवला नवा अंदाज! बुलडाणा जिल्ह्यात पुढील ५ दिवस असे राहील हवामान...

 
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून संततधार पाऊस सुरू आहे. आतापर्यंत कोरडी असलेली जलाशये भरली आहेत तर काही आज ,उद्या भरतील अशी स्थिती आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची पुढील रब्बी हंगामाची सिंचनाची चिंता मिटली असे म्हटले तरी वावगे होणार नाही. दरम्यान आज, ३ सप्टेंबर रोजी हवामान विभागाने बुलडाणा जिल्ह्यासाठीचा अंदाज वर्तवला आहे. 
पुढील ५ दिवस जिल्ह्यात सार्वत्रिक पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. आज ३ सप्टेंबर व उद्या ४ सप्टेंबर रोजी जिल्ह्यात सार्वत्रिक हलक्या ते मध्यम पावसाची शक्‍यता आहे. 
 ५ ते ७ सप्टेंबर दरम्यान बहुतांश ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे. आज,३ सप्टेंबर रोजी जिल्ह्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस सुद्धा कोसळू शकतो असाही अंदाज आहे. जिल्हा कृषी हवामान केंद्र व कृषी विज्ञान केंद्राने हा अंदाज भारतीय हवामान विभागाच्या सौजन्याने वर्तवला आहे.
शेतकऱ्यांसाठी महत्वाचा सल्ला...
जिल्ह्यात काल काही ठिकाणी मुसळधार पाऊस झाला असून शेतात,फळबागांत पावसाचे अतिरिक्त पाणी साचले आहे. म्हणून या पाण्याचा योग्य मार्गाने ताबडतोब निचरा करावा.
 येत्या दोन दिवसांत सार्वत्रिक पावसाची शक्यता असल्याने मुंग/उडीद पिकांची कापणी केली असल्यास संबंधित शेतमाल ताबडतोब सुरक्षित ठिकाणी साठवून ठेवावा.
 शेतातील नियोजित फवारणी, आंतरमशागत, खत देणे ई. कामे पाऊस पडून गेल्यावर करावी.डास,माशी यांच्या व्यवस्थापनासाठी गोठ्यात डेल्टामेथ्रीनची फवारणी करावी. तसेच जनावरांचा गोठा स्वच्छ व कोरडा ठेवावा.मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता पाहता शेतकऱ्यांनी स्वतःची व आपापल्या जनावरांची योग्य ती काळजी घ्यावी. खराब हवामान परिस्थिती असताना जनावरांना सुरक्षित ठिकाणी बांधून ठेवावे.विजांच्या पुर्वसुचनेसाठी दामिनी या मोबाईल अॅपचा वापर करावा.