दारूबंदीसाठी मेहकर तालुक्यातील वडगाव माळीच्या महिला एकवटल्या, वैतागून पोलीस अधीक्षकांच्या कार्यालयावर धडकल्या!

 
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) मेहकर तालुक्यातील वडगाव माळीत खुलेआम होत असलेल्या दारूविक्रीने मोठी समस्या निर्माण झाली आहे. गावातील अनेक लोक सकाळपासून दारू ढोसतात. याचा महिलांना त्रास सहन करावा लागतो. हा त्रास सहन तरी कुठवर करायचा अखेर दारूबंदीसाठी अख्या गावातील महिला एकवटल्या. आणि आज २६ जून रोजी महिलांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या कार्यालयाला धडक दिली. 
      साखरखेर्डा पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या वडगाव माळी येथे मोठ्या प्रमाणात दारू विक्री होते. गावातील बहुसंख्य शेतकरी, शेतमजूर आणि अन्य काही लोक दारूच्या आहारी गेले आहे. आमचे गाव व्यसनाच्या वादळाने ग्रस्त असून याचा महिलांना त्रास सहन करावा लागतोय. दारूमुळे कुणाच्या ना कुणाच्या घरात दररोजची किरकिर चालते, महिलांचा सुरक्षेचा सवाल देखील उठतो अश्या शब्दांत वडगाव माळीच्या महिलांनी अप्पर पोलीस अधीक्षक बी.बी.महामुनी यांच्या समोर आपली समस्या मांडली. तातडीने गावात दारूबंदी झाली पाहिजे अशी मागणी महिलांनी केली. दरम्यान, सर्व महिलांचे म्हणणे ऐकल्यानंतर अप्पर पोलीस अधीक्षक बीबी महामुनी यांनी साखरखेर्डा ठाणेदारांशी संपर्क केला आणि गावात होत असलेल्या दारूविक्री विरोधात तातडीने कारवाई करण्याचे आदेश दिले.