सिंदखेडराजा ते शेगाव भक्ती महामार्ग रद्द करण्यासाठी ग्रामस्थांचे अनोखे आंदोलन ; सकाळ सकाळी थाळ्या वाजवत वेधले प्रशासनाचे लक्ष!

चिखली तालुक्यातील गांगलगाव, पांढरदेव येथील असंख्य गावकऱ्यांनी केली निदर्शने..
 
चिखली(ऋषी भोपळे: बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) शासन प्रस्तावित सिंदखेडराजा ते शेगाव या भक्ती महा मार्ग विरोधात ठिकठिकाणी रोष व्यक्त केल्या जात आहे. या मार्गामुळे शेतकरी भूमिहीन होत आहे, प्रशासनाने तात्काळ या महामार्गाचे काम थांबवून तो रद्द करावा अशी आर्त मागणी चिखली तालुक्यातील शेकडो शेतकऱ्यांनी केली आहे. दरम्यान, आज २७ जूनच्या सकाळीच ७ वाजता पांढरदेव, गांगलगाव या गावातील ग्रामस्थांनी थाळी बजाव आंदोलन करीत सिंदखेडराजा शेगाव भक्ती महामार्गाला विरोध दर्शविला. 
  १०९ किलोमीटर अंतराचा असलेला हा महामार्ग शेतकऱ्यांसाठी घातक ठरत आहे. यामध्ये अनेकांच्या जमिनी जात असून, शासन मोबदला देत आहे. परंतु ते पुरणारे नाही. महामार्गाचे काम झाल्यास शेतकरी भूमिहीन होणार आहे. आधीच सिंदखेड राजा ते शेगाव असा चांगला रस्ता आहे. त्यामुळे या नवीन महामार्गाची गरज नाही. याआधी अनेक राजकीय प्रतिनिधींनी सुद्धा सिंदखेडराजा शेगाव या भक्ती महामार्गाला विरोध केला आहे. असे आंदोलक शेतकरी सांगतात. शासनाने सिंदखेडराजा शेगाव मार्गावरील जमीन मालकांचा, शेतकऱ्यांचा विचार करून तात्काळ या महामार्गाचे काम थांबवावे. अशी मागणी केल्या जात आहे. दरम्यान, आज झालेल्या थाळी बजाव आंदोलनाची कुठलीही पूर्वसूचना प्रशासनाला देण्यात आली नाही. निवेदनही देण्यात आले नाही. अगदी सकाळीच ग्रामस्थांनी महामार्ग विरोधात आपला रोष व्यक्त करत प्रशासनाचे लक्ष वेधले.