Amazon Ad

जिल्ह्यातील तापमान चाळीशी पार! २१ जणांना उष्माघाताचा फटका, दुपारी १२ ते ३ यावेळेत बाहेर पडणे टाळा..

 
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह) जिल्ह्यातील तापमान वाढले आहे. अडीच महिन्यात २१ जणांना कडक उन्हाचा फटका बसला असून दवाखान्यात भरती व्हावे लागले आहे. आजवर सरासरी ३८ ते ४० डिग्रीच्या दरम्यान तापमान राहत होते, परंतु अलीकडे तापमान ४० पार गेल्याने चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली आहे. एकेकाळी थंड हवेचे ठिकाण म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बुलढाण्यात पहिल्यांदाच कमालीचे तापमान पाहायला मिळाले. 
 शहराच्या तुलनेत अन्य तालुक्यात तापमानाचे प्रमाण अधिक आहे. प्रामुख्याने घाटाखालील खामगाव, मलकापूर, शेगाव, जळगाव, संग्रामपुर तालुक्यांमधील तापमान मध्यंतरी बेचाळीस डिग्रीच्या आसपास राहिले आहे. १ मार्च ते १० मे, या कालावधीत जिल्ह्यातील २१ जणांना उष्माघाताचा फटका बसल्याची आरोग्य विभागात नोंद आहे. एप्रिल महिन्यात हे प्रमाण वाढले असून मे मध्येही बहुसंख्या रुग्ण आढळून आले आहेत. यामध्ये खामगाव तालुक्यातील ८, शेगाव ४, बुलढाणा १, मेहकर ५, लोणार १, तसेच सिंदखेडराजा तालुक्यातील दोघांचा समावेश आहे. उष्माघातांच्या रुग्णांमध्ये महिलांचे प्रमाण जास्त आहे. उष्माघाता सारख्या गंभीर आजारापासून बचाव करण्यासाठी दुपारी १२ ते ३ या वेळेत बाहेर पडणे टाळावे, भरपूर पाणी प्यावे, घराबाहेर पडल्यास पांढऱ्या कपड्यांनी डोके कान, झाकावे, थंड पदार्थांचे सेवन करावे, भरपूर पाणी प्यावे असा सल्ला डॉक्टरांकडून देण्यात येत आहे.