चिखलीच्या तहसीलदारांनी आधी माहिती दिली नाही; बुलडाणा लाइव्हची बातमी प्रकाशित झाल्यावर पत्रकच काढले! म्हणाले, "बातमी चुकीची"! बुलडाणा लाइव्हलाही चूक मान्य, पण "हे" ध्यानात घ्या!
तहसीलदारांच्या आहरण व संवितरण खात्यात २०,७४,९६३ रुपये..!
Updated: Jun 18, 2024, 21:45 IST
देऊळगाव घुबे(ऋषी भोपळे:बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): चिखली तालुक्यातील देऊळगाव घुबे येथे वादळाने छतासह झोका उडून गेल्याने ६ महिन्यांची चिमुकली सई भारत साखरे हीचा मृत्यू झाला होता. दरम्यान केंद्रीय मंत्री ना.प्रतापराव जाधव यांनी संवेदनशीलता दाखवत नागरी सत्काराचे कार्यक्रम बाजूला ठेवून जिल्ह्यात येताच देऊळगाव घुबे गाठले. शासनाच्या वतीने ४ लाख रुपयांच्या मदतीचा धनादेश ना. जाधव यांच्या हस्ते देण्यात आला. स्वतः ना.प्रतापराव जाधव यांनीदेखील व्यक्तिगत रोख स्वरूपाची मदत साखरे कुटुंबियांना केली. दरम्यान आज,१८ जून रोजी मृतक चिमुकलीचे वडील भारत साखरे यांना प्रशासनाच्या वतीने सध्या चेक लावू नका असे सांगण्यात आल्याचे त्यांनी बुलडाणा लाइव्ह शी बोलतांना सांगितले. त्यावर बुलडाणा लाइव्हने चिखली तहसील कार्यालयात जाऊन तहसीलदार यांचे म्हणणे जाणून घेतले असता " मी आजच आलो, दोन तीन दिवस सुट्टीवर होतो, मला यासंदर्भात माहिती नाही" असे उत्तर दिले " संबधित खात्यात पैसे आहे का? अशी विचारणा केली असता मला माहिती नाही, मी आत्ता माहिती देऊ शकत नाही, उद्या देतो असे तहसीलदार श्री.काकडे म्हणाले होते. या प्रकारानंतर चिमुकलीच्या कुटुंबीयांना तातडीने मदत मिळाली पाहिजे या प्रामाणिक उद्देशाने, सदहेतूने बुलडाणा लाइव्हने एक वृत्त प्रकाशित केले होते. तहसीलदारांच्या खात्यात पैसे नाही का? असा सवाल त्या वृत्तात उपस्थित करण्यात आला होता. शिवाय सदर धनादेश ना.प्रतापराव जाधव यांच्या हस्ते पिडीत कुटुंबाला देण्यात असल्याचे नमूद केले होते. मात्र या वृत्तानंतर एकच खळबळ उडाली. पिडीत कुटुंबाला तातडीची मदत मिळावी यासाठी प्रयत्न करणारे ना.प्रतापराव जाधव यांचे नाव सदर वृत्तात असल्याने प्रकरण प्रशासनाने गांभीर्याने घेतले. आधी माहिती देण्यास टाळाटाळ करणाऱ्या तहसीलदार श्री. काकडेंनी मग एक प्रसिध्दीसाठी पत्रकच काढले. चिखली तहसीलदार यांचे आहरण व संवितरण अधिकारी यांचे खात्यात आज रोजी २० लाख ७४ हजार ९६३ रुपये असल्याची माहिती तहसीलदारांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात दिली आहे. त्यामुळे मृत पावलेल्या सईच्या कुटुंबियांना ४ लाख रुपयांचा धनादेश दिला पण खात्यात पैसेच नाही! ही बातमी चुकीचे असल्याचे तहसीलदारांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे..
"बुलडाणा लाइव्ह" ला चूक मान्य, पण..
बुलडाणा लाइव्ह हे जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय माध्यम आहे. दिवसाला साडेतीन ते साडेचार लाख वाचक बुलडाणा लाइव्ह ला भेट देतात. जबाबदार, प्रामाणिक आणि सामान्य माणसांच्या वेदनेप्रति कळकळ असल्याने बुलडाणा लाइव्ह ला ही लोकप्रियता प्राप्त झाली आहे. आज मृतक सईच्या कुटुंबियांना दिलेल्या धनादेश संदर्भातील बातमी ही चिमुकलीच्या कुटुंबियांना तातडीने मदत मिळाली पाहिजे या संवेदनमुळे प्रकाशित करण्यात आली. केंद्रीय मंत्री ना.प्रतापराव जाधव किंवा महसूल प्रशासनावर विनाकारण बोट ठेवण्याचा कोणताही हेतूही सदर वृत्तात नव्हता. संबधित अधिकाऱ्यांनी जर व्यवस्थित माहिती उपलब्ध करून दिली असती तर बुलडाणा लाइव्ह कडून चुकीचे वृत्त प्रकाशित होऊन गैरसमज निर्माण झाला नसता. तरीही संबधित चुकीच्या बातमीमुळे "टीम बुलडाणा लाइव्ह" दिलगिरी व्यक्त करीत आहे. पण बुलडाणा लाइव्हचा हेतू प्रामाणिक आणि चिमुकलीच्या कुटुंबीयांना मदत मिळावी हा होता हे तेवढेच खरे..!
बुलडाणा लाइव्ह ने केली मदत ...
दरम्यान संबधित वृत्त प्रकाशित झाल्यानंतर काहींनी तुम्ही केवळ बातम्या छापता, तुम्हाला एवढा कळवळा आहे तर तुम्ही का मदत करत नाही अशा प्रतिक्रिया दिल्या. त्यामुळे काही न सांगण्याचे ठरवलेल्या गोष्टी इथे सांगणे महत्वाचे वाटते. पिडीत चिमुकलीच्या कुटुंबियांना शासनाची मदत मिळण्याआधी "टीम बुलडाणा लाइव्ह" ने देऊळगाव घुबे इथे जाऊन मदतनिधी चिमुकलीच्या कुटुंबीयांना सुपूर्द केला होता. बुलडाणा लाइव्ह हे बुलडाणा जिल्ह्यातील तमाम जनतेच्या कुटुंबाचा भाग आहे. त्यामुळे आपल्या परिवारासाठी काही केले तर त्याचा गाजावाजा करायचा नसतो म्हणून बुलडाणा लाइव्ह ने त्याचे वृत्त किंवा फोटो प्रकाशित केला नव्हता. मात्र बुलडाणा लाइव्हने काय केले हे विचारणाऱ्यांना उत्तर मिळावे म्हणून वरील फोटो प्रसिद्ध करीत आहोत..