संघर्षाची फलश्रुती! सामान्य शेतकरी कुटुंबात जन्म, पोलीस अंमलदार ते कर्तव्यदक्ष ठाणेदार म्हणून सेवानिवृत्ती; प्रल्हाद काटकरांचा असा आहे प्रवास;१२ वी चा निकाल लागण्याआधीच झाले होते पोलीस..!
Feb 28, 2024, 12:10 IST
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): सामान्य शेतकरी कुटुंबात जन्म झाल्यानंतर किती आणि कसा संघर्ष वाट्याला येतो हे वेगळे सांगण्याची गरज नाही..मात्र आईवडिलांच्या कष्टाचा पांग फेडण्याची जिद्द मनात असली की अशक्य असं काहीच नसतं..पोलीस निरीक्षक प्रल्हाद काटकर यांचा आजवरचा प्रवास याचीच साक्ष देणारा ठरला आहे. पोलिस प्रशासनात जाऊन समाजाची सेवा करू इच्छिणाऱ्या प्रत्येकासाठी प्रल्हाद काटकर आयडॉल आहेत. आज,२८ फेब्रुवारीला पोलीस निरीक्षक प्रल्हाद काटकर सेवानिवृत्त होत आहेत, त्यानिमित्ताने बुलडाणा लाइव्ह ने घेतलेल्या त्यांच्या सेवाकाळाचा आढावा..!
वाशीम जिल्ह्यातील मंगरूळपीर तालुक्यातील कासोळा या छोट्याश्या गावातील सामान्य शेतकरी कुटुंबात प्रल्हाद काटकर यांचा जन्म झाला. ३ भाऊ,२ बहिणी असा मोठा कौटुंबिक गोतावळा.. घरची आर्थिक परिस्थिती बेताचीच असली तरी प्रल्हाद काटकर यांच्या आईवडिलांनी मुलांच्या शिक्षणाच्या बाबतीत कोणतीच कसर सोडली नाही. त्याचीच परिणीती काटकर कुटुंबाच्या उद्धारात झाली आहे. प्रल्हाद काटकर यांचे एक भाऊ नायब तहसिलदार एक भाऊ जिल्हा परिषद शिक्षक आहेत तर एक भाऊ हाडाचे शेतकरी आहेत. प्रल्हाद काटकर यांचे प्राथमिक शिक्षण गावच्या जिल्हा परिषद शाळेत झाले. माध्यमिक शिक्षणासाठी प्रल्हाद काटकर यांना दररोज काळेगाव पर्यंत ६ किमी चा पायी प्रवास करावा लागला. कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षण अकोला येथील श्री शिवाजी महाविद्यालयात पूर्ण केले. दरम्यान १२ वी परीक्षेचा निकाल लागण्याआधीच १९८४ ला श्री.काटकर अकोला जिल्हा पोलिस दलात भरती झाले. काबाड कष्ट करणाऱ्या शेतकरी आईवडीलांच्या चेहऱ्यावर लेकराच्या यशाचा आनंद मावत नव्हता. दरम्यान पोलीस अधिकारी अंमलदार म्हणून अकोला येथील पोलिस प्रशिक्षण केंद्रात प्रशिक्षण घेत असताना ७०० प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यांमधून काटकर यांनी पहिला क्रमांक देखील मिळवला.
थांबायचे कशाला?
पोलिस सेवेत संधी मिळाल्यानंतर देखील काटकर थांबले नाहीत, शिक्षणाची भूक त्यांनी थांबवली नाही. अकोला जिल्हा पोलिस दलात अकोट पोलीस ठाण्यात कार्यरत असताना त्यांनी B.COM ची परीक्षा दिली, एवढेच नव्हे तर महाविद्यालयातून प्रथम येण्याचा मान त्यांनी मिळवला. यावेळी अकोट शहरातील नागरिकांनी काटकर यांचा नागरी सत्कार केला होता. १६ वर्षे पोलीस अंमलदार म्हणून सेवा दिल्यानंतर २००० साली महाराष्ट्र लोकसेवा आयोगाद्वारे घेण्यात आलेल्या पोलीस उपनिरीक्षक पदाच्या परीक्षेत त्यांनी घवघवीत यश मिळवले आणि त्यावेळी एकत्रित असलेल्या अकोला वाशिम जिल्ह्यातून प्रथम येण्याचा बहुमान मिळवला आणि प्रल्हाद काटकर "अधिकारी" झाले..
पोलिस उपनिरीक्षक पदाचे प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर २००० ते आतापर्यंत प्रल्हाद काटकर यांनी महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यात आतापर्यंत १२ पोलीस ठाण्यात ठाणेदार म्हणून कर्तव्य बजावले. पोलिस अंमलदार पासून पोलीस सेवेची सुरुवात झाल्याने छोट्या छोट्या गोष्टींचा बारकाईने अभ्यास झाला होता, त्याचा फायदा त्यांनी अधिकारी म्हणून काम करतांना झाला. या काळात अधिकारी म्हणून काम करतांना आपल्या कनिष्ठ सहकाऱ्यांच्या पाठीवर ते कायम कौतुकाची थाप देतांना दिसले. त्यामुळे कामाच्या अधिकारी आणि कर्मचारी अशी दरी त्यांनी निर्माण होऊ दिली नाही, त्याचा परिणाम असा झाला की अनेक क्लिष्ट प्रकरणांचा , आव्हानात्मक ठरेल अशा घटनांचा तपास श्री काटकर यांच्या कार्यकाळात झटपट पूर्ण झाला..
बुलडाणा जिल्ह्यातील कार्यकाळ ठरला लक्षवेधी..!
२०१९ पासून ते आजपर्यंत प्रल्हाद काटकर यांनी बुलडाणा जिल्ह्यात जबाबदारी सांभाळली. मलकापूर सारख्या अतिसंवेदनशील ठाण्याची जबाबदारी यशस्वीपणे सांभाळल्यानंतर तत्कालीन जिल्हा पोलिस अधीक्षक अरविंद चावरिया यांनी श्री.काटकर यांच्यावर जिल्हा मुख्यालय असलेल्या बुलडाणा शहर पोलिस ठाण्याची जबाबदारी सोपवली. नेहमीची आंदोलने, मोर्चे, उपोषणे यासह इतर गुन्ह्यांमुळे जिल्ह्यातील सर्वाधिक व्यस्त पोलीस स्टेशन म्हणून ओळख असलेल्या बुलडाणा शहर पोलीस ठाण्याची जबाबदारी श्री काटकर यांनी चोखपणे सांभाळली. पिंपळगाव रेणुकाई येथील कक्षसेवकाचे समलिंगी संबंधांतून झालेले खुनाचे प्रकरण असो की घरफोडीचे, बलात्काराचे, खंडणीचे गुन्हे.. श्री काटकर यांनी अतिशय कौशल्याने या सगळ्या प्रकरणांचा वेळेत तपास पूर्ण केला. अलीकडेच झालेल्या डॉ.सौरभ संचेती यांच्याकडून खंडणी उकळण्याच्या गुन्ह्यात आरोपींना काही तासांत जेरबंद केले. बुलडाणा शहरातील अतिशय वर्दळीचा असलेला इकबाल चौक पूर्वी रात्री २ वाजेपर्यंत सुरू असायचा. तिथे टवाळखोर मुले रात्री उशिरापर्यंत गोंधळ घालायची, त्यातून त्या परिसरात सातत्याने गुन्हे घडत होते. श्री काटकर यांनी साऱ्या प्रकाराचा तातडीने बंदोबस्त केला, रात्री १० नंतर चौक परिसरातील दुकाने बंद झालीच पाहिजेत याकडे कटाक्षाने लक्ष दिली, परिणामी या भागातील रात्रीची वर्दळ कमी होऊन गुन्ह्यांचे प्रमाण कमी झाले. आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने श्री.काटकर यांची महिनाभरापूर्वी सायबर पोलीस ठाण्यात बदली. या अल्पकाळात तिथे देखील श्री.काटकर यांनी अनुभव पणाला ६ मोठ्या गुन्ह्यांचा छडा लावला.
कौतुकास्पद कामगिरी..
तब्बल ३९ वर्षे ७ महिने एवढ्या प्रदीर्घ सेवाळात श्री.काटकर यांना अनेक पदकांनी गौरवण्यात आले. गडचिरोली जिल्ह्यातील पेरमिली या नक्षलग्रस्त पोलीस ठाण्यात कार्यरत असतांना ३ वेळेस नक्षल्यांसोबत तुफान चकमक झाली, या मोहिमेचे नेतृत्व स्वतः प्रल्हाद काटकर करीत होते. यावेळेला कोणत्याही पोलीस कर्मचाऱ्याची जीवितहानी व वित्तहानी न होऊ देता नक्षल्यांना पिटाळून लावण्याचे काम श्री.काटकर यांनी केले. या कौतुकास्पद कामगिरीमुळे मा.पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य यांच्या द्वारे खडतर सेवेचे दोन वेळेस पोलीस पदक प्रल्हाद काटकर यांना प्राप्त झाले. याशिवाय आजवरच्या सेवेत एकूण २१० बक्षिसे आणि १२ प्रशस्तीपत्रे या कर्तृत्ववान अधिकाऱ्याला मिळाली आहेत. आज श्री.प्रल्हाद काटकर सेवानिवृत्त होत आहेत. त्यांच्या पुढील आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा..!!