रोजगार हमी योजने वरील मजुरांची संख्या अठरा हजारांवर! सिंचन विहिरींची कामे वाढल्याचा परिणाम

 
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : जिल्ह्यात सुरू असलेल्या रोजगार हमी योजनेच्या कामावरील मजुरांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत असून आज ही संख्या १८ हजारांवर गेली आहे. शेतीच्या कामांना न आलेला वेग आणि सिंचन विहिरींच्या कामात झालेली वाढ यामुळे ही वाढ झाली आहे.
  लोकसभा निवडणुकीत ग्रामीण भागातील बेरोजगार, मजुराच्या हाताना कामे मिळालीत. २६ एप्रिलला झालेल्या मतदानानंतर मात्र या 'रिकाम्या हातांनी' रोजगार हमी योजनेकडे मोर्चा वळविला. या कामावरील मजुरांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत असल्याचे चित्र आहे. २७ एप्रिल ला असलेली मजुरसंख्या ( ८९४७) ५ मे रोजी १२,०६० वर गेली. यानंतर मजुरांची कामांची मागणी वाढतच गेली आहे.७ मे १५०६३मजूर, ९ ला १७४३९ तर आज शनिवारी ती १८ हजार १८२ वर पोहोचली आहे. येत्या काही दिवसांत मजूर संख्या २० हजाराचा आकडा गाठेल अशी चिन्हे आहेत.
  सव्वा पाचशे विहिरींची कामे 
 दरम्यान सध्या जिल्ह्यात रोहयोची २७८३ कामे सुरू आहेत. यात सडक, वृक्षारोपण, गोठे, तुती लागवड, घरकुल या कामाचा समावेश आहे. सिंचन विहिरींची तब्बल ५२२ कामे सुरू आहे. ही कामे पाऊस सुरू होण्यापूर्वी करावयाची असल्याने नजीकच्या काळात मजुरांची संख्या जास्तच राहणार आहे.