हाती टाळ, मुखी पांडुरंगाचे नाम! पालखीचे सारथ्यही केले.. वारकऱ्यांची केली सेवा, लग्न वाढदिवशी महाले दाम्पत्यांचा आदिशक्ती मुक्ताईचरणी भक्तीचा ठेवा..
Jun 24, 2024, 08:47 IST
चिखली(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) आदिशक्ती संत मुक्ताईच्या पालखीने १८ जून रोजी विठुरायाच्या भेटीसाठी प्रस्थान केले. मुक्ताईनगरातून हरिनामाच्या गजरात पालखी पुढे मार्गस्थ होत आहे. दोन दिवसांपूर्वी बुलढाणा, काल चिखली येथे पालखीचा मुक्काम राहिला. दरम्यान, काल २३ जून रोजी संत मुक्ताईची पालखी चिखलीत मुक्कामी होती. यावेळी चिखली विधानसभा मतदारसंघाच्या आमदार श्वेताताई महाले व त्यांचे पती विद्याधर महाले यांनी पालखीतील सहभागी वारकऱ्यांची मनोभावी सेवा केली. वारकऱ्यांचे चरण धुतले, मुक्ताईच्या भक्तीत तल्लीन होऊन टाळ वाजवत पालखी खेळली, नव्हे तर महाले दांपत्यांनी पालखीचे सारथ्यही केले. विशेष म्हणजे, महाले दाम्पत्याचा लग्नाचा वाढदिवस काल होता. यानिमित्ताने संतसेवा करीत आ. श्वेता महाले आणि त्यांचे पती विद्याधर महाले यांनी आशीर्वाद घेतले.
शेकडो वर्षापासून लाखो करोडो, भाविकांचे श्रद्धास्थान आणि वारकऱ्यांचे आस्थास्थान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पंढरपूर नगरीत विठू माऊलीच्या दर्शनासाठी संतांचा मेळा भरतो. आषाढी व कार्तिकी एकादशीला महाराष्ट्राच्या कान्या कोपऱ्यातून शेकडो दिंड्या पंढरपुरात दाखल होतात. महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे, त्याप्रमाणेच विविध संतांच्या श्रद्धा ठिकाणाहून या पालख्या विठू माऊलीच्या भेटीसाठी प्रस्थान करतात. आदिशक्ती संत मुक्ताईच्या पालखीचे यंदा ३१५ वे वर्ष आहे. पालखीचे ठीक ठिकाणी स्वागत होत आहे. दरम्यान, २३ जून रोजी आदिशक्ती मुक्ताईची पालखी चिखलीत दाखल झाली. यावेळी मोठ्या भक्ती भावात, चिखलीकरांनी पालखीचे स्वागत केले. मतदार संघाच्या आमदार श्वेता महाले आणि त्यांचे पती उपमुख्यमंत्री फडणवीस यांचे खाजगी सचिव विद्याधर महाले यांनी लग्न वाढदिवसाच्या योग साधून पालखीतील वारकऱ्यांची सेवा केली.
मतदार संघाच्या विकासासाठी शक्ती दे, आ.श्वेताताईंनी केली प्रार्थना!
मोठ्या उत्साहात चिखलीत पालखीचे स्वागत झाल्यानंतर, पालखीत सहभागी वारकऱ्यांचे महाले दाम्पत्यांनी चरण धुतले. त्यानंतर, हाती टाळ घेऊन विठू नामाच्या भक्ती तल्लीन देखील झाले. त्याआधी त्यांनी पालखीचे सारथ्य देखील केले. याप्रसंगी संत मुक्ताईच्या पादुकांचे दर्शन घेतल्यानंतर 'मतदार संघाच्या विकासासाठी शक्ती दे' अशी प्रार्थना आ. श्वेताताई महाले यांनी केली.