BREAKING खडकपूर्णा धरणात रेतीमाफियांवर सर्जिकल स्ट्राईक ! महसूल प्रशासन, पोलिसांची संयुक्त कारवाई सुरू; अतिरिक्त पोलिस कुमक तैनात! रेती उपसा करणाऱ्या बोटी उध्वस्त होणार..
May 17, 2024, 17:41 IST
देऊळगावमही (ऋषी भोपळे: बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): खडकपूर्णा धरणातून अवैद्य रेती उपसा जोमात सुरू आहे, यासंदर्भात आता थेट विविध स्तरातून जिल्हाधिकाऱ्यांना जबाबदार धरण्यात येत असल्याने महसूल प्रशासन पुन्हा एकदा ऍक्टिव मोडवर आले आहे. आज, १७ मे रोजी उपविभागीय अधिकारी ,देऊळगाव राजा चे तहसीलदार यांच्यासह महसूल आणि पोलीस प्रशासनाची टीम खडकपूर्णा धरणात उतरली असून रेतिमाफियांवर सर्जीकल स्ट्राइक सुरू केला आहे. विश्वसनीय सूत्रांकडून प्राप्त माहितीनुसार आतापर्यंत १० पेक्षा अधिक रेती उपसा करणाऱ्या बोटी पकडण्यात आल्या असून त्या ब्लास्ट करण्यात येणार आहेत. युवा सेनेचे उपजिल्हाप्रमुख संतोष भुतेकर यांनी या संदर्भात वेळोवेळी आंदोलने केली होती, त्याची दखल घेत महसूल प्रशासन आता गांभीर्याने पाऊले उचलतांना दिसत आहे. वृत्त लिहितेवेळी ही कारवाई सुरू असून रात्री उशिरापर्यंत ही कारवाई सुरू राहू शकते. महसूल आणि पोलीस प्रशासनाची टीम खडकपूर्णा धरणातून अवैध रेती उपसा करणाऱ्या बोटींचा शोध घेत असून वेगवेगळी पथके धरणात उतरून हे काम करीत आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार एक टीम जालना जिल्ह्याच्या हद्दीत घुसून कारवाई करत आहे.