Amazon Ad

दुःखद कहाणी! वाचून काळजाचं पाणी पाणी होईल; अर्ध्यावरती डाव मोडला, अधुरी एक कहाणी! तब्बल ६ दिवस आजी नवऱ्याचा मृतदेह मांडीवर घेऊन होती, पोटात अन्नाचा कण नव्हता!

पोरांनी तर मायबापाकडे ढुंकूनही पाहिलं नाही... सेवासंकल्प प्रतिष्ठानचे नंदकुमार पालवे लिहितात...
 
   करमाड गाव तसं गजबजलेलं. MIDC आणि ती ही छ. संभाजीनगर (औरंगाबाद ) सारख्या मोठ्या शहराची, त्यामुळे लवकरच करमाड ला ही शहराची कळा प्राप्त होत आहे..इथेच ५ वर्षांपासून एक आजी आजोबा एका ऍग्रो इंडस्ट्री च्या बाजूला ताडपत्री ची खोपट(खोपडी )करून राहत होते. आजोबा रोज गावात जायचे काही बाही मागून आणायचे आजीला ही खाऊ घालायचे अन उरलं सुरलं आपण खाऊन तृप्तीचा ढेकर देऊन झोपायचे...    ना नशिबाला दोष द्यायचे, ना आपल्या कर्माला , ना ज्यांनी मुंबई हुन आणून संभाजीनगर ला रस्त्यावर सोडलं त्या पोटच्या मुलांना दोष द्यायचे..
आला दिवस पुढे ढकलत हे सत्तरितील जोडपं एकमेकांच्या दुःखाचा साक्षीदार होऊन दिवस काढत होतं..
आजी तशी बोलायला गोड, मायाळू, ऐका भेटीत समोरच्याला आपलंसं करून टाकणारी, आजोबा तिची फार काळजी घ्यायचे, दुखलं खुपलं पाहायचे, खूप प्रेम करायचे तिच्यावर... मात्र आजी जन्मत: अंध होती डोळ्यांच्या जागी फक्त खोबण्या... आयुष्यात मुलांनी पेरलेला अंधार तिने पाहू नये म्हणून देवाने तिला डोळेच दिले नाही...पूर्णतः अंध आजीला घेऊन हा बाबा आपल्या दुर्दैवी संसाराचा गाडा पुढे लोटत होता, येईल तो दिवस मागे टाकत होता...
  एक दिवस रात्री आलेलं अन्न खाऊन बाबा व आजी झोपली.. सकाळी सूर्यनारायणाच्या आगमनाने सर्व जग जागं झालं मात्र बाबा उठलेच नाही... आजीला वाटलं थकले असतील म्हणून झोपू दिलं...दुपार झाली, संध्याकाळ झाली आजीच्या पोटात कावळे ओरडत होते म्हणून भुकेने व्याकुळ आजीने बाबा ला हलवलं तरी बाबा उठला नाही... बाबा थंडगार निपचित पडलेला, तोंडावर माश्या घोंगावत होत्या...
आजीच्या मनात शंकेची पाल चुकचूकली आणि आजीने बाबाच्या छातीवर डोकं ठेऊन आवाज येतो का पाहिलं... आजीने एकच हंबरडा फोडला...तिचा प्राणप्रिय पाती झोपेतच मरण पावला होता...
आजीने आरडा ओरडा केला, धडपडत झोपडीच्या दारात जाऊन आजू बाजूच्यांना रडत ओरडत आवाज दिले, "मह्या नवऱ्याले काय झालं पहा" म्हणून डोकं बडवून घेत होती... मात्र करमाड ला शहरी कळा येत असल्याने कोणाचंच तिकडे लक्ष गेलं नाही आणि कुणी तिकडे ढुंकूनही पाहिलं नाही...
नवऱ्याचं मढं खोपडीत पडलं आहे, कुणाला बोलवायला धडपडत जावं आणि एखाद्या कुत्र्याने येऊन बाबा चा लचका तोडला तर? "नाही नाही... मला आहे तशी सांभाळणाऱ्या नवऱ्याला असं एकटं टाकून नाही जाणार मी... "ज्यानं मला आंधळी असताना आयुष्यभर सांभाळलं, ऐपत नसताना माझे हट्ट पुरवले, सुख दुःख वाटून घेतला... पावसाच्या कित्येक रात्री त्यांच्या मांडीची उशी करून या झोपडीत मी राहिले, त्यांना असं एकटं सोडू?? नाही जमायचं...
आज पर्यंत त्यांनी मला उशी दिली, आज मी त्यांना उशी देते म्हणून आजीने आपल्या मेलेल्या नवऱ्याचं डोकं आपल्या मांडीवर ठेवलं आणि ती नवऱ्याशी शेवटच्या गप्पा मारत बसली...
आपण कसे दिवस काढले, मुलांना चांगले संस्कार दिले मात्र ते फितूर झाले व त्यांनी घराबाहेर काढलं, मुलांच्या सुखासाठी मेहनतीने बांधलेलं घर एका क्षणात आपण सोडलं... तुमच्यावर भरोसा होता माझा म्हणून लंकेची पार्वती बनून दारोदारी ठोकरा खात भीक मागत जगले.. आनंदाच्या वेळी साखरेने तोंड गोड करून आपण आनंदाने हसलो तर दुःखाच्या वेळी एकमेकांचे खांदे ओले केले... आणि आता तुम्हाला असं एकटं सोडू मी?? आजी आपल्या निपचित पडलेल्या नवऱ्यासोबत शेवटचं मन मोकळं करीत होती... आजीला वाटलं कोणी तरी येईल आणि मला मदत करेल.. पण कोणी आलं नाही... डोळ्यांच्या खोबन्यातून अश्रू गाळत गाळत आजी मनाशीच तब्बल ६ दिवस बोलत होती... पोटात अन्न पाणी काहीच नाही... ज्याने शेवटच्या श्वासापर्यंत साथ दिली त्या नवऱ्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत आजी पण सोबत होती....
काय अवस्था असेल ५० वर्षाचा संसार ज्याच्या सोबत नेटाने केला, स्वतः च्या घरात ज्याच्या सोबत नांदले, पोरांनी टाकल्यावर ज्याच्या हाताला धरून रस्त्यावर भीक मागत फिरले, तो आता नसणार आहे, रोज ज्याच्या येण्यान मला भाकर भेटायची, तो आता नसणार आहे, जो मला हाताने भरवायचा तो आता नसणार आहे... काय भावना असेल त्या ७० वर्षाच्या माऊलीची?
 
      ६ दिवसानंतर शेजारच्यांना खूप दुर्गंधी यायला लागली म्हणून त्यांनी जाऊन पाहिलं तर आजीच्या मांडीवर बाबांचा टम्म फुगलेला देह पडलेला आणि नाका कानातून डोळ्यातून अळ्या आत बाहेर करत असलेल्या... अनेकांना उलट्या झाल्या... पोलीस बोलावले गेले... पोलिसांनी करमाड चे सामाजिक कार्यकर्ते सर्वश्री योगेश कुलकर्णी, गणेश कोरडे, बबलू तारो, गणेश आघाडे यांना बोलावले व त्यांनी व सहकारी मंडळी ने आजोबांच्या उत्तरीय तपासणी नंतर अंत्यविधी करून आजीला सुखरूप सेवा संकल्प प्रतिष्ठान पळसखेड सपकाळ जि. बुलढाणा येथे पोचविले...
"आज मले मह गणगोत भेटलं, बाबा ला पण आधीच आणता आलं असतं तर त्यो असा बेवारस मेला नस्ता.. " असं म्हणून आजीने पुन्हा नसलेल्या डोळ्यांच्या खोबनीला पदर लावला. 
By नंदकुमार पालवे 
सेवा संकल्प प्रतिष्ठान 
पळसखेड सपकाळ
ता. चिखली जि. बुलढाणा 
9404991927