रविकांत तुपकर..! आंदोलनाचं दुसरं नाव! ज्येष्ठ पत्रकार, राजकीय विश्लेषक राजेंद्र काळे यांचा विशेष लेख..!

 
rt
बुलडाणा (राजेंद्र काळे): भोंग्यांच्या कल्लोळात आंदोलनं हरवत असताना, ज्यांनी कुठल्याही भोंग्यांविना आंदोलनांचा आवाज गाजवत अन वाजवत ठेवला.. त्या रविकांत तुपकर यांचा आज वाढदिवस !त्यांच्या दीड तपाचा हा आंदोलनात्मक प्रवास-बुलडाणा शहरात खासगी क्लासेसचं पेव फुटलं ते २००० नंतर, खेड्या-पाड्याहून शाळा-कॉलेजात शिकायला येणारी शेतकऱ्यांची पोरांचं आर्थिक शोषण.. हा त्या शिकवणीवाल्यांचा केंद्रबिंदू होता. तेंव्हा त्या क्लासेसवाल्यांना चपारा देण्याचे आंदोलन कोणीतरी एक सावळ्याचा पोरगा करतो आहे, एवढं समजलं.. अन् हाच विशीतला पोरगा त्यावेळी पहिल्यांदा ‘देशोन्नती’ कार्यालयात आला. त्याची पोटतिडीक बघितली, अन् त्या खासगी क्लासेसवाल्यांच्या विरोधात ‘देशोन्नती’मध्ये वृत्तमालिका सुरु झाली.. अर्थात ज्यांना चपारे बसत होते, ते प्राध्यापकही मित्र होते.. पण पत्रकारीता करतांना मित्रत्व दूर ठेवावं लागतं. महाविद्यालयात शिकत होते, अर्थात वेळ आली तेंव्हा मित्र असतानांही तुपकरांनाही तेल लावून बातम्यांमधून झोडलं आहेच!

१३ मे, आज तुपकरांचा वाढदिवस. तसा हा कार्यकर्ता वाढदिवस साजरा न करणारा, आजही त्यांनी दिवसभर 'स्वाभिमानी हेल्पलाईन सेंटर'मध्ये बसून कार्यकर्त्यांची काम करण्याला त्यांनीप्राधान्य दिले. अर्थात कार्यकर्ते, मित्र परिवार व हितचिंतक पुष्पगुच्छ घेऊन आले तेव्हा त्यांनी त्यांच्या प्रेमाचा आदर करून शुभेच्छाही स्वीकारल्या..हा भाग वेगळा !

रविकांत तुपकरांचं आंदोलनात्मक आक्रमण, हे त्यांचं चळवळीतील संक्रमण राहीलं. तो काळच होता, शरद जोशींनी भारावून सोडलेल्या शेतकरी संघटनेतल्या चळवळीचा. त्यात रविकांत ओढल्या गेला. दहिद या मामाच्या गावी जन्म व चवथीपर्यंत शिक्षण, पुढे सावळ्यातुन सायकलीवरुन बुलडाण्याच्या भारत विद्यालयात अप-डाऊन. सायन्सलाही प्रवेश, पण त्यांचे प्रयोग शेती-मातीशीच जुळलेले. दूध-दही वाटून स्वावलंबनातून शिक्षणाचा बुलडाण्यातील एका भाड्याच्या खोलीतला प्रवास.. शेतकऱ्याच्या लेकराच्या नशीबी जो संघर्ष असतो, तो या पोरानंही केलांच. शाळेत हुशार असतांनाही एका प्रश्नाचं उत्तर न आल्यानं ‘हे शेतकऱ्याचं पोरगं नांगरावरच जाणार’ या त्यांना एका शिक्षकानं सुधारण्यासाठी केलेल्या टिपणीनं, खरंच रविकांतमध्ये सुधारणा झाली व आयुष्यात काहीतरी करुन दाखवायचं, या इर्शेने पेटलेला हा अंगार आंदोलनातला वणवा होवून भडकला.

शेतकरी संघटनेतल्या चळवळीत डंकेलचं जागतिक अर्थकारण मांडणाऱ्या कार्यकर्त्यांमध्ये व त्यांच्यात, एका पिढीचं अंतर पडल्याने सूर जुळत नव्हते. ते लोक ‘गॅट’वर बोलत होते, तर रविकांतला ‘बॅट’ हाती घेतलेल्या शेतकऱ्यांच्या पोरांचे प्रश्न महत्वाचे वाटत होते.. म्हणून त्यांनी युवा आघाडी खोलली, पण तिथंही हे पोट्टं काहीही आंदोलनं करतं.. अशी टेहाळणी झाल्याने शरद जोशींचा लाडका असतांनाही तुपकर हे राजू शेट्टींच्या आक्रमक मार्गावर वळले. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या युवा आघाडीचे प्रदेशाध्यक्ष बनले, अन् तिथून जोमात सुरु झाला आंदोलनांचा धुमधडाका. पश्चिम महाराष्ट्रातल्या ऊस आंदोलनात तर ‘मुलूख मैदानी तोफ’ म्हणून तुपकरांची भाषणं गाजू लागली, शेट्टी-खोत-तुपकर या त्रयींनी मूळ शेतकरी संघटनेलाही ओव्हरटेक केले.. अन् ‘ऊस परिषद’ हा पश्चिम महाराष्ट्रातील कारखानदारीला हादरा देणारा ‘हॉटस्पॉट’ ठरु लागला.. पुढं दुधाचीही आंदोलनं झाली, राज्यकर्त्यांना घाम फोडणारी स्वाभिमानीची आंदोलनं ठरु लागली, एवढं की शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या निर्वाणाआधी उध्दव ठाकरेंना स्वाभिमानीला आंदोलन मागे घेण्याचं आवाहन करावं लागलं, पश्चिम महाराष्ट्रातून शिवसैनिक मुंबईला पोहचण्यासाठी.

ऊसासाठी स्वाभिमानी पश्चिम महाराष्ट्रात जर रान पेटवते, तर कापूस-सोयाबीनसाठी विदर्भात का नाही? म्हणून रविकांत तुपकरांनी पुढाकार घेवून स्वाभिमानी शेकरी संघटनेतर्फे विदर्भात ‘कापूस-सोयाबीन परिषदा’ घेतल्या, अगदी नागपूर विधीमंडळापर्यंत धडकी भरविणारी धडक मारली. नाही काहीतरी तेंव्हापासून सोयाबीन हा विषय सरकारच्या अजेंड्यावर आला. काही महिन्यांपूर्वीच त्यांनी सोयाबीनच्या भावासाठी अन्नत्याग आंदोलन केले होते चांगलेच गाजले !

आंदोलनं, त्यातून गुन्हे, कोर्ट-कचेऱ्या ह्या सर्व बाबी तुपकरांसाठी जीवनाचा अविभाज्य भाग होत असतांना, जीवनसाथीही यातूनच मिळावा.. हाही योगायोगच. स्वत:सह कार्यकर्त्यांच्या जमानती घ्यायला पैसे नसायचे, तेंव्हा अधून-मधून जेलची हवा ठरलेलीच. पण अगदी त्याच काळात ‘बुलडाणा नागरीक हक्क संरक्षण समिती’ अ‍ॅड. अशोक सावजी चालवायचे, नागरीकांच्या संरक्षणासाठी आंदोलनाचा त्यांना अनुभव असल्याने, अशा आंदोलनकर्त्यांची जमानत ते फुकटात करुन द्यायचे. त्यावेळी त्यांच्यासोबत त्यांची मुलगी अ‍ॅड.शर्वरी ही जमानत प्रकरणे हाताळायची. त्यातूनच ‘रविकांत व शर्वरी’ या जोडीचे वैचारीक बंध हे प्रेमविवाहाच्या संबधापर्यंत जावून पोहोचले.. म्हणजेच ‘आंदोलनातून प्रेम अन् प्रेमाचेही आंदोलन’ ही त्यांची ऋणानुबंधाची गाठ एका ‘वृत्तदर्पण’मधून मीच बांधलीय!

२०१२ला बुलडाणा जिल्हा केंद्रीय सहकारी बँकेचा मुद्दा घेवून, तुपकरांनी प्रस्थापित नेत्यांविरोधात पुकारलेला एल्गार.. डफडे वाजवता वाजवता चांगलाच गाजला, इतका की त्यांना तडीपार व्हावं लागलं. अजूनही बँक ताळ्यावर आली नाही. हा आंदोलनांचा संघर्षमय प्रवास सुरुच राहीला, अगदी आताच्या लॉकडाऊन आधीही पोल्ट्री फार्मवाल्यांच्या व्यथा चव्हाट्यावर आणण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या गेटवर त्यांनी कोंबड्या सोडून केलेले आंदोलन, हे ती ‘बाग' सत्ताधाऱ्यांपर्यंत पोहचवणारं ठरलं!

या १८ वर्षाच्या आंदोलनात्मक प्रवासात तुपकरांना मात्र राजकीय प्लॅटफॉर्म मिळाला नाही, ‘बस कंडक्टर की तरह हो गयी है जिंदगी, जाना कहाँ है मालूम नही’ असं ‘डबल घंटी’ वाजवणं त्यांचं सुरुच आहे. नेमकी त्यांच्या दळणाची वेळ येती, अन् चक्कीची लाईन जाते.. असं २००९, २०१४ व २०१९ या तिन्हीवेळी झालं. नाही म्हणायला त्यांना एकदा महायुतीच्या सत्ताकाळात महामंडळाचा लाल दिवा भेटला, पण राजू शेट्टी-सदाभाऊ खोत वादात त्यालाही लाथ मारुन शेट्टींची साथ त्यांनी सोडली नाही. मात्र विधानसभेपुर्वी काय झालं होतं काय माहित, तुपकर हे सदाभाऊंच्या ‘रयत’मध्येही जावून आले.. अर्थात एका हप्त्यातच ते स्वाभिमानीत माघारी आले, ही आयुष्यातली सर्वात मोठी चूक झाल्याचे नंतर त्यांनी स्पष्ट केले. त्यानंतर मात्र वर्षभर स्वाभिमानीत फक्त कार्यकर्ता म्हणून काम करण्याचं प्रण त्यांनी केलं, अन् तेच आता प्राणपणाने सुरु आहे. लॉकडाऊनच्या काळात प्रस्थापित राजकीय पक्षांचीही हेल्प सेंटर जेवढी काम करत नसतील, त्यापेक्षा कैक पटीनं तुपकरांच्या ‘स्वाभिमानी हेल्प सेंटर’चं काम सुरु आहे.

वरुड- मोर्शीतील त्यांचं भाषण एका कार्यकर्त्यांसाठी आमदारकीची वाट आखणारं ठरलं, मात्र बुलडाणा लोकसभा मतदार संघात त्यांची भाषणे गाजली असलीतरी राज ठाकरेंसारखाच त्यांचा भाषणाचा उपयोग करुन घेतला गेला नाही ना ? अशी शंकाही त्यावेळी अनेकांनी व्यक्त केली.. अर्थात शिंगणे निवडून आले असतेतर तुपकर हिरो ठरले असते, पण अश्या उधडं बोलण्याचं समर्थन करता येणार नाहीच.

मुलगी अन् मुलांच्या जन्मावेळीही पदयात्रेत स्वाभिमानीचे सारथ्य करणारे, आमदारकी-खासदारकीच म्हणजे राजकारण नसल्याचे सांगणारे, विविध वृत्त वाहिन्यांवर स्वाभिमानीचा म्हणण्यापेक्षा शेतकऱ्यांचा प्रवक्ता म्हणून सरकारवर हल्ला चढविणारे व या सर्व धावपळीत मित्रांसाठी कौटुंबीक ऋणानुबंध जोपासणारे.. रविकांत तुपकर. त्यांच्याविषयी कितीही लिहीलं तरी ते पुर्णत्वास जाणार नाही, म्हणून कुठेतरी पुर्णविराम देतांना.. रविकांत तुपकरांच्या आंदोलनात्मक प्रवासावर लिहावसं वाटलं.. अर्थात याचदरम्यान त्यांचा वाढदिवस यावा, हा निव्वळ योगायोग. ‘वक्ता’ हा ‘नेता’ होवू शकतो, हे मिटकरींनी दाखवून दिलं, पण ‘वक्तृत्व’ अन् ‘नेतृत्व’ असतांनाही राजकीय सत्तावर्तुळात तुपकर यांना ‘कर्तृत्व’ दाखविण्याची संधी मिळू नये.. याला काय म्हणावं? शेवटी तो जे शेर भाषणाच्या शेवटी म्हणतात, तोच म्हणावा वाटतो-
‘राह में खतरे है तो ठहरता कौन है,
मौत कल क्यों- आज आये डरता कौन है?..
तेरे लष्कर के मुकाबील मैं अकेला हूँ मगर,
फैसला मैदान में होगा- मरता कौन है??’

तेच मैदान ताकद दाखविण्यासाठी त्यांना लवकरच मिळावं, व तुपकर तेल लावून आखाड्यात उतरावेत.. कारण त्यांच्या नशीबी मागचा दरवाजा नसावा, ‘छप्पर फाडके’ असंच स्वभावाप्रमाणं काहीतरी होणार असावं.. तूर्ततरी त्यांच्यासाठी एक शेर-
‘मेरे कोशीशों को सराहो, मेरे हमराह चलो..
मैंने एक शमा जलायी है, हवाओं के खिलाफ!’