करतवाडीत भक्तीमहामार्गाला विरोध! दुसरीकडे सिंदखेडराजात एसडीओंना भेटून शेतकरी म्हणाले, आमचे महामार्गाला समर्थन..काय आहे समर्थनाचा मुद्दा, वाचा...
Aug 6, 2024, 16:07 IST
सिंदखेडराजा(ऋषी भोपळे:बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): एकीकडे भक्ती महामार्गाला जोरदार विरोध होत असताना आता याच भक्ती महामार्गाच्या समर्थनात देऊळगावराजा तालुक्यातील शेतकऱ्यांचा एक गट उभा राहिला आहे. आज सकाळी चिखली तालुक्यातील करतवाडी येथे प्रस्तावित भक्ती महामार्गाला विरोध करण्यासाठी बाधित शेतकऱ्यांची मुले टॉवर वर चढली होती. या आंदोलनाची जिल्हाभर चर्चा सुरू असतानाच देऊळगाव राजा तालुक्यातील काही शेतकऱ्यांनी सिंदखेडराजा येथे उपविभागीय अधिकाऱ्यांना भेटून भक्ती महामार्गाच्या समर्थनाचे पत्र दिले.
भक्ती महामार्गाला मान्यता मिळाल्याने लाखो भाविक आणि शेतकरी आनंदित झाल्याचा दावा एसडीओंना दिलेल्या समर्थन पत्रात केला आहे. भक्ती महामार्गाला आवश्यक जमीन देण्यास आम्ही तयार आहोत, म्हणून सरकारने होऊ घातलेल्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला आमची संमती आहे. शासनाने तत्परतेने भूसंपादनाची प्रक्रिया लवकरात लवकर पार पाडावी. भक्ती महामार्गाला देखील समृद्धी महामार्गाप्रमाणे पाचपट मोबदला द्यावा अशी मागणीही या पत्रात केली आहे.