Amazon Ad

राज्यात एक कोटी वृक्षलागवडीची मोहीम ! जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील म्हणाले, जिल्ह्यात सर्व घटकांनी सहभागी व्हा.. सामाजिक वनीकरण आणि कृषी विभागाकडून मोफत रोपे मिळतील..

 
बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): शासनाच्या निर्णयानुसार एक जुलैपासून एक कोटी वृक्षलागवडीस सुरवात होणार आहे. या मोहिमेत जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर वृक्षलागवड करण्यासाठी सर्व घटकांना सहभागी करून घेण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी दिली.
  जिल्हाधिकारी कार्यालयात वृक्षलागवडी संदर्भात आढावा घेण्यात आला. यावेळी उपजिल्हाधिकारी डॉ. जयश्री ठाकरे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी संजय इंगळे आदी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी डॉ. पाटील म्हणाले, वृक्ष लागवड मोहिम यशस्वीपणे राबविण्यासाठी देण्यात आलेले उद्दिष्ट पूर्ण करावे. यासाठी शाळा, महाविद्यालय, ग्रामपंचायती, कर्मचारी, बचतगटांच्या महिलांना या मोहिमेत सहभागी करून घेण्यात यावे. या वृक्ष लागवडीसाठी रोपे मोफत देण्यात येणार आहे. तसेच शेतकऱ्यांना त्यांच्या बांधावर फळपिक घेण्यासाठी प्रोत्साहन देण्यात येऊन वृक्ष लागवड करावी, यासाठी प्रयत्न करण्यात येत आहे. वृक्ष लागवडीमधील रोपे वाढविण्यासाठी प्रयत्‍न करण्यात येणार आहे. तसेच ही झाडे दत्तक घेण्याबाबत जनजागृती करण्यात येणार आहे. वृक्ष लागवड मोहिमे सोबतच बांबूची लागवड करण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहे. बांबूची रोपे इश्वेद बायोटेक या कंपनीकडून देण्यात येणार आहे. त्यामुळे यंत्रणांनी तातडीने रोपांची मागणी नोंदवावी. बांबू शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना तीन वर्षात हेक्टरी ७ लाख ४० हजार रूपयांचे अनुदान देण्यात येणार आहे. त्यामुळे बांबू शेती करण्यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहित करण्यात येणार आहे. मनरेगा अंतर्गत बांबू लागवड करण्यात येणार आहे. यासाठी शासनाचे स्वतंत्र निर्देश येणार आहे. त्यानुसार राज्य शासनाची ही प्रमुख योजना म्हणून राबविल्या जाणार आहे. बांबू लागवडीसाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी प्रशिक्षण देण्यात येणार आहे. यातून बांबू लागवड आणि विपनन संदर्भात माहिती देण्यात येणार आहे. वृक्षांची रोपे सामाजिक वनीकरण आणि कृषी विभागाच्या नर्सरीमधून देण्यात येणार आहे. वृक्ष लागवड मोहिमेसाठी जागा निश्चिती करण्यात यावी. यासाठी मोकळ्या जागा, अतिक्रमीत जागांचा शोध घेऊन याठिकाणी वृक्ष लागवड करण्यात यावी. शाळांमधील मोकळ्या जागा, कुंपन, ग्रामपंचायतीचे क्षेत्र, तसेच प्रत्येक कर्मचाऱ्याकडून एक झाड लागवड करण्यात येणार आहे. तसेच जिल्ह्यातील २८ हजार बचतगटांच्या महिलांनाही यात सहभागी करून त्यांच्याकडून वृक्ष लागवड करण्यात येणार आहे. वृक्षाचे संगोपन करण्यासाठी ही झाडे दत्तक देण्यात येणार आहे.