बातमी शेतकऱ्यांच्या कामाची! अन्न प्रक्रिया उद्योगांसाठी मिळणार तीन कोटींपर्यंत अनुदान; व्याजात ३ टक्के सवलतही मिळणार! वाचा कशी आहे प्रक्रिया...

 

 बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): स्थानिक, स्वदेशी, गावरान, सेंद्रिय पारंपरिक उत्पादनांना वाव देण्यासाठी केंद्र पुरस्कृत आत्मनिर्भर भारत मोहिमेंतर्गत - प्रधानमंत्री सुक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योग योजना कृषी विभागामार्फत राबविण्यात येत आहे. यात कृषीप्रक्रिया उद्योजक उभारणीसाठी प्रकल्पाच्या ३५ टक्के, तसेच कमाल तीन - कोटी रुपयांचे अनुदान दिले जाणार आहे. यात शेतकरी उत्पादक कंपन्यांसह शेतकरी गटांना प्राधान्य देण्यात येणार आहे. 

 नव्याने स्थापित होणाऱ्या किंवा - सद्यस्थितीत कार्यरत सुक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योगांना विस्तारीकरण, स्तरवृद्धीसाठी या योजनेतून एक जिल्हा एक उत्पादन यावर आधारित कृषी प्रक्रिया उद्योगांना प्राधान्य दिले जाणार आहे. या योजनेंतर्गत भांडवली गुंतवणूक, सामायिक पायाभूत सुविधा, इनक्यूबेशन सेंटर, स्वयंसाह्यता गटाच्या सदस्यांना बीज भांडवल, मार्केटिंग व ब्रेडिंगकरिता आर्थिक साह्य देण्यात येत आहे. वैयक्तिक अन्न प्रक्रिया उद्योगांना प्रकल्प किमतीच्या ३५ टक्के किंवा जास्तीत जास्त १० लाख तर सामायिक पायाभूत सुविधा, इनक्यूबेशन केंद्र, मूल्यसाखळी घटकांसाठी प्रकल्प किमतीच्या ३५ टक्के किंवा कमाल ३ कोटी अर्थसाह्य देण्यात येणार आहे.
उद्योजक, शेतकरी, बेरोजगार युवक, महिला, भागीदारी संस्था, तसेच गट लाभार्थीमध्ये शेतकरी उत्पादक गट, कंपनी, संस्था, स्वयंसहाय्यता गट, सहकारी, शासकीय संस्थांनी कृषी व अन्न प्रक्रिया उद्योग उभारणी किंवा त्यांचे विस्तारीकरण, स्तरवृद्धी व आधुनिकीकरण करण्यासाठी प्रधानमंत्री सुक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेत सहभाग नोंदवावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी मनोजकुमार ढगे यांनी केले आहे. 
असे केल्यास व्याजात तीन टक्के सवलत
प्रकल्प आराखडे तयार करणे, बँकेकडे सादर करणे, तसेच नोंदणीसाठी कृषी विभागाकडून जिल्हा संसाधन व्यक्तीमार्फत सहाय्य केले जाणार आहे. आत्मातील नोंदणीकृत शेतकरी गट, शेतकरी उत्पादक कंपनी व वैयक्तिक शेतकरी यांनी प्रकल्प करतेवेळी प्रधानमंत्री सुक्ष्म खाद्य उद्योग योजनेसोबत कृषी पायाभूत योजनेची सांगड घातल्यास अनुदानासोबत तीन टक्के व्याजात सवलत मिळणार आहे.