लाडकी बहिण योजनेत नवे बदल, तलाठी, तहसील, कार्यालयात गर्दी करण्यापेक्षा वाचा कोणत्या अटींमध्ये झाले बदल?
मुदत वाढली, 'हे' प्रमाणपत्र मिळवण्याची गरज नाही.. कोणते आहेत नवीन बदल ? सगळं बातमीत वाचा, टेन्शन कमी होणार..
Jul 3, 2024, 07:58 IST
बुलडाणा ( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) अंतरिम अर्थसंकल्पात राज्यातील महिला व माता भगिनींसाठी राज्य सरकारने मोठं गिफ्ट दिले ते, लाडकी बहिण योजनेच्या रूपाने. योजनेच्या लाभासाठी १ जुलैपासून अर्जप्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. दरमहा १५०० रुपये इतके अनुदान मिळणार आहे. आधी १५ जुलै पर्यंत मुदत असल्याने तलाठी कार्यालय, तहसील कार्यालय, नगरपालिका या ठिकाणी महिलांच्या रांगाच रांगा लागल्याचे दिसून आले. हा सगळा खटाटोप तो केवळ दोन प्रमाणपत्रासाठी.. एक डोमेशियल, आणि दुसरे म्हणजे उत्पन्नाचा दाखला. आता या दोन्ही दाखल्यांची अट सरकारने शिथिल केली आहे. आणखी काही अटींमध्ये महत्वाचे बदल करण्यात आले असून महिलांचे टेन्शन कमी होणार आहे.
सुरुवातीला १५ जुलै पर्यंत अर्ज करता येणार असल्याचे सांगितले होते. परंतु गावोगावी, ठिकठिकाणी लाभार्थी महिलांची भली मोठी गर्दी पाहता सरकारने ही मुदत ३१ ऑगस्टपर्यंत वाढवून देण्याचा निर्णय घेतला आहे. आधी महत्त्वाच्या कागदपत्रांमध्ये डोमेशियल सर्टिफिकेट बंधनकारक होते. परंतु हे प्रमाणपत्र मिळवण्यासाठी महिलांची दमछाक होत असल्याचे दिसून आले. त्यामुळे डोमेशियल सर्टिफिकेट ऐवजी पंधरा वर्षे जुने रेशन कार्ड, मतदान ओळखपत्र, जन्माचा दाखला, शाळा सोडण्याचा दाखला देता येणार आहे. अडीच लाखांच्या उत्पन्नाच्या दाखल्याऐवजी पिवळे आणि केशरी रेशन कार्ड धारकांना उत्पन्नाच्या दाखल्यातून सूट देण्यात आली आहे. या योजनेच्या वयोमर्यादेत सुद्धा वाढ करण्यात आली आहे. ६० वर्षा ऐवजी ६५ वर्षापर्यंतील लाभार्थी महिला लाभ मिळवू शकणार आहेत. जमिनीची देखील अट काढून टाकण्यात आल्याचे मुख्यमंत्री शिंदे यांनी काल झालेल्या पावसाळी अधिवेशनात सांगितले. या योजनेच्या नोंदणीसाठी सरकारने मोफत केले आहे. तरी तरीदेखील काही कार्यालयांमध्ये पैसे उकळून आवश्यक ते प्रमाणपत्र मिळवून देण्याचा प्रकार सुरू आहे. असे असल्यास संबंधित विभागाच्या अधिकाऱ्याला ही बाब लक्षात आणून द्यावी. किंवा बुलडाणा लाइव्हशी संपर्क करावा असे आवाहन करण्यात येत आहे.