"संस्कृती सबकी एक चिरंतन..!" सिंदखेडराजात लखुजीराजेंच्या समाधीसमोर उत्खननात सापडली भगवान विष्णूंची मूर्ती; महिनाभरापूर्वी सापडली होती शिवपिंड!

 
सिंदखेड राजा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): मातृतीर्थ सिंदखेड राजा नगरीत राजे लखुजीराव जाधव यांच्या समाधीस्थळासमोर सुरू असलेल्या उत्खननात महिनाभरापूर्वी शिवमंदिर सापडले. आता १९ जूनला पुन्हा एक सुबक मूर्ती आढळली. ही भगवान विष्णूची शेषशाही मूर्ती असल्याचे केंद्रीय पुरातत्व खात्याचे डॉ. अरुण मलिक यांनी सांगितले. या मूर्तीमुळे नागरिकांची उत्खननाबाबतची उत्कंठा अधिक वाढली आहे. आधी शिवमंदिर आणि आता भगवान विष्णूंनी मूर्ती सापडल्याने" संस्कृती सबकी एक चिरंतन" याचा प्रत्यय येत आहे.या पवित्र भूमितील भूगर्भामध्ये आणखी काय दडलयं, याचा शोध घेतला जात आहे.
सिंदखेड राजा येथे राजे लखुजीराव जाधव यांच्या समाधीस्थळासमोर भारतीय पुरातत्व विभागाच्या वतीने अधिकारी डॉ. अरुण मलिक यांच्या देखरेखीखाली उत्खनन करण्यात येत आहे. १९ मे रोजी उत्खनन सुरू असताना शिवमंदिर आढळून आले. एक मोठी शिवपिंड तेथे सापडली. जमिनीत असलेल्या मूर्त्यांच्या अवशेषांचे नुकसान होऊ नये, याची काळजी घेत हळूवार उत्खनन सुरू आहे. या उत्खननामध्ये १९ जून रोजी एक मोठी लक्ष्मीनारायणाची मूर्ती सापडली.
पुरातन मंदिर आणि मुर्त्यांचे अवशेष सापडू लागल्याने नागरिकांमध्ये कुतूहल निर्माण झाले आहे. त्यामुळे या परिसरातील संपूर्ण जमिनीमध्ये उत्खनन करण्याची गरज आहे. याप्रसंगी भारतीय पुरातत्व विभागाचे नागपूर येथील डॉ. अरुण मलिक यांच्यासह सहायक अधिवक्त शिल्पा जामगाडे, श्याम बोरकर, शाहीर अख्तर तसेच अधिकार व कर्मचारी उपस्थित होते. 
संपूर्ण मूर्ती काढण्यासाठी लागणार दोन दिवस
आढळलेली मूर्ती कुठलेही नुकसान न होता जमिनीबाहेर काढण्याचे काम गेल्या दोन दिवसांपासून सुरू आहे. अर्धी मूर्ती जमिनीच्या आत असून दोन दिवस उत्खनन केल्यानंतर संपूर्ण मूर्ती बाहेर काढण्यात येणार आहे. ही आकर्षक व मनमोहक मूर्ती आहे. महिनाभरापूर्वी लखुजी राजेंच्या समाधीसमोर जमिनीखाली महादेवाचे मंदिर निघाले होते. या मंदिराच्या दक्षिण बाजूलाच लक्ष्मीनारायणाची मूर्ती सापडली.